रणजी ट्रॉफी ही भारतातील एक मानाची मानली जाणारी देशांतर्गत स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असते. तसेच खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी भारतीय संघात स्थान देण्यासाठीही अनेकदा लक्षात घेतली जाते.
याच स्पर्धेत खेळताना अनेक खेळाडूंनी मोठी कामगिरी केली आहे. त्यातील रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या ३ क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा –
३. चेतेश्वर पुजारा – पुजाराने आत्तापर्यंत ७ द्विशतके रणजी ट्रॉफी स्पर्धेत केली आहेत. तो रणजी ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत अजय शर्मासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सौराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पुजाराने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना १३ द्विशतके केली असून त्यात त्याच्या ७ रणजी ट्रॉफीतील द्विशतकांचा समावेश आहे. तसेच सध्या पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये कुमार संगकारासह अव्वल क्रमांकावर आहे. त्यानेही १३ द्विशतके प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली आहेत.
२.अजय शर्मा – देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू म्हणजे अजय शर्मा. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना ६७.४७ च्या सरासरीने १०१२० धावा केल्या आहेत. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्यांमध्ये डॉन ब्रॅडमन, विजय मर्चंट आणि जॉर्ज हेडली यांच्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहेत.
१९८४-८५मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अजय शर्माने रणजीमध्ये खेळताना ७ द्विशतके केली आहेत. ही द्विशतके त्यांनी दिल्लीकडून खेळताना केली आहेत. त्यातील २५९ धावांची खेळी ही त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वैयक्तित सर्वोच्च धावांची खेळी आहे.
१. पारस डोग्रा – २००१-०२ च्या मोसमात रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पारसने मागील वर्षीच्या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये पाँडिचेरीकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध ८ वे द्विशतक केले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये ८ द्विशतके करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता.
त्यानंतर त्याने यावर्षीच्या २०१९-२० च्या मोसमात मिझोरमविरुद्ध खेळताना २०० धावांची खेळी करत रणजी ट्रॉफीतील ९ वे द्विशतक केले. त्यामुळे आता रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्यामध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे.
ट्रेडिंग घडामोडी –
सतत अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतच्या यशाचा मार्ग सापडला ऑस्ट्रेलियन खेळाडूला
वनडे आणि कसोटीत असा पराक्रम करणारा सेहवाग जगातील एकमेव खेळाडू