भारताला मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या भडसावत आहे. भारतीय संघाने या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. पण अजूनही भारतीय संघात या क्रमांकावर कोणीही स्थान पक्के करु शकलेले नाही.
वनडेत मागच्या १० वर्षांमध्ये भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळलेल्या खेळाडूंचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०१० पासून या क्रमांकावर भारतीय संघाकडून वनडेत २० खेळाडू खेळले आहेत. त्यांच्यातील केवळ विराट कोहली आणि युवराज सिंग २ खेळाडूंना या क्रमांकावर खेळताना १००० धावा करता आल्या आहेत.
१ जानेवारी २०१० पासून वनडेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय क्रिकेटपटू (Most runs at No. 4 in ODIs for India since 2010)-
१. विराट कोहली – १४८१ धावा
सध्या भारताचा कर्णधार असलेला विराट कोहली आता बऱ्याचदा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसतो. पण मागील १० वर्षांत त्याने ३६ वनडे सामन्यातील ३४ डावात चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. या ३४ डावात त्याने ५२.८९ च्या सरासरीने १४८१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. युवराज सिंग – १२१८ धावा
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने वनडेत बऱ्याचदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. २०१० पासून तो या क्रमांकावर सर्वाधिक सामन्यात फलंदाजी करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने १ जानेवारी २०१० पासून या क्रमांकावर ४३ वनडे सामन्यातील ४० डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ३४.८० च्या सरासरीने १२१८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
३. अजिंक्य रहाणे – ८४३ धावा
मागील काही वर्षापासून रहाणे मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे. पण त्यानेही २०१३ ते २०१८ या दरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने २७ वनडे सामन्यातील २५ डावात या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या २५ डावात त्याने ६ अर्धशतकांसह ३६.६५ च्या सरासरीने ८४३ धावा केल्या आहेत.
४. अंबाती रायडू – ७५० धावा
भारतीय संघाकडून अंबाती रायडूने २०१३ ते २०१९ दरम्यान मध्यल्या फळीत दमदार कामगिरी केली होती. या दरम्यान काही वर्षे त्याच्याकडे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात होते. पण नंतर त्यानेही भारतीय संघातील स्थान गमावले. त्याने चौथ्या क्रमांकावर भारतीय संघाकडून २७ वनडे सामन्यातील २४ डावात फलंदाजी केली. त्याने या २४ डावात त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ४१.६६ च्या सरासरीने ७५० धावा केल्या आहेत.
५. एमएस धोनी – ६५० धावा
मागील काही वर्षांत यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने विविध क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तो भारताच्या वनडे संघात १५ वर्षांपासून मधल्या फळीतील नियमित फलंदाज होता. १ जानेवारी २०१० पासून धोनीने चौथ्या क्रमांकावर १८ वनडे सामन्यातील १८ डावात फलंदाजी केली आहे. त्यात त्याने ४ अर्धशतकांसह ४०.६२ च्या सरासरीने ६५० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिग घडामोडी –
गांगुली- धोनीत खूप वेगळेपण, जे गांगुलीने केलं त्याच्या बरोबर उलटं धोनीने केलं
मॅच फिक्सिंग होऊ नये म्हणून बीसीसीआय खेळाडूंच्या नकळत करते या गोष्टी
ज्या वर्षी खेळाडू अंडर १९ खेळतात तेव्हा या ५ खेळाडूंनी कसोटीत केले होते कारनामे