---Advertisement---

मुंबई नाही तर सीएसके आहे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ, कसं ते घ्या जाणून

On: मंगळवार, मे 30, 2023 10:53 AM
Chennai-Super-Kings
---Advertisement---

गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला पराभवाची धूळ चारत चेन्नई सुपर किंग्स संघाने दाखवून दिले की, ते ‘कमबॅक सुपर किंग्स’ का आहेत. सोमवारी (दि. 29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनी याच्या चेन्नईने 5 विकेट्सने गुजरातचा पराभव केला. या विजयात रवींद्र जडेजा, डेवॉन कॉनवे यांसह इतर खेळाडूंनीही मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे चेन्नईच्या नावावर मुंबई इंडियन्सप्रमाणे सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी झाल्या आहेत. मुंबईनेही 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले, तरीही चेन्नई संघ हा मुंबईपेक्षाही जास्त यशस्वी संघ आहे. यामागील कारणासह आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या 7 संघांविषयी जाणून घेऊयात…

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेले 7 संघ
1. चेन्नई सुपर किंग्स

गुजरात टायटन्सला आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का देत चेन्नई सुपर किंग्स संघाने 5वे आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर केले. यासह त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचीही बरोबरी केली. मात्र, मुंबई आणि चेन्नईचे प्रत्येकी 5 विजेतेपद असले, तरीही चेन्नई संघच मुंबईपेक्षा यशस्वी ठरतो. यामागील कारण आहे, चेन्नईची स्पर्धेतील कामगिरी. चेन्नई संघाने आजपर्यंत एकूण 14 हंगाम खेळले आहेत. आयपीएलचा 16वा हंगाम असला, तरीही चेन्नई संघ मधल्या 2016 आणि 2017 या हंगामात बेटिंगमुळे घालण्यात आलेल्या बंदीमुळे स्पर्धेबाहेर होता.

त्यामुळे चेन्नईने 14 हंगामच खेळले, पण यादरम्यान चेन्नईला तब्बल 5 वेळा (2010, 2011, 2018, 2021, 2023) विजेतेपद मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, जेवढ्या वेळा विजेतेपद जिंकले आहे, तेवढ्याच वेळा चेन्नई उपविजेतेपदही पटकावले आहे. त्यामुळे चेन्नई संघ मुंबईवर वरचढ ठरतो. याव्यतिरिक्त चेन्नई संघ एक वेळा उपांत्य सामन्यातून बाहेर पडला होता. तसेच, संघाला 1 वेळा प्ले-ऑफमध्ये आणि 2 वेळा साखळी फेरीत अपयशाचा सामना करावा लागला होता.

2. मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वच्या सर्व म्हणजेच 16 आयपीएल हंगाम खेळले आहेत. यादरम्यान मुंबईनेही 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019, 2020) आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, चेन्नईप्रमाणे त्यांना जास्त वेळा उपविजेतेपद पटकावता आले नाही. मुंबई संघ आतापर्यंत फक्त 1 वेळाच उपविजेतपद पटकावण्यात यशस्वी झाला आहे. याव्यतिरिक्त मुंबईवर 4 वेळा प्ले-ऑफ आणि 6 वेळा साखळी फेरीतच स्पर्धेचा शेवट करण्याची वेळ आली आहे.

3. कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई आणि मुंबईनंतर आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाची गणना होते. केकेआरनेही आतापर्यंत 16 आयपीएल हंगाम खेळले आहेत. त्यात त्यांना 2 वेळा (2012, 2014) विजेतेपद जिंकण्यात यश आले आहे. याव्यतिरिक्त ते एक वेळा उपविजेतेपदावर खुश राहिलेत. तसेच, त्यांनी 4 वेळा प्ले-ऑफमध्ये येऊन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. याव्यतिरिक्त 9 वेळा केकेआरला साखळी फेरीतच गटांगळ्या खाव्या लागल्या आहेत.

4. सनरायझर्स हैदराबाद
आयपीएलमधील चौथा सर्वात यशस्वी संघ सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आहे. हैदराबादने 11 हंगाम खेळताना आयपीएल 2016 या एकाच हंगामात विजय मिळवला होता. तसेच, त्यांनी 1 वेळा उपविजेतेपदही पटकावले आहे. हैदराबादला 4 वेळा प्ले-ऑफ फेरीत येऊन स्पर्धा समाप्त करावी लागली आहे, तर तब्बल 5 वेळा त्यांना साखळी फेरीतूनच स्पर्धेचा शेवट करावा लागला आहे.

5. राजस्थान रॉयल्स
आयपीएल 2008 या उद्घाटनाचा हंगाम गाजवणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) होय. शेन वॉर्न याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने स्पर्धेचा पहिला वहिला हंगाम आपल्या नावावर केला होता. मात्र, त्यानंतर त्यांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीये. चेन्नईप्रमाणेच बेटिंगमुळे घालण्यात आलेल्या बंदीमुळे राजस्थानही 2 वर्षे स्पर्धेतून बाहेर होता. त्यांनी एकूण 14 हंगामात खेळताना 1 वेळा विजय आणि 1 वेळा उपविजेतेपद (2022) पटकावले. याव्यतिरिक्त त्यांनी 3 वेळा प्ले-ऑफची वारी केली, तर 9 वेळा साखळी फेरीतच त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला.

6. गुजरात टायटन्स
आयपीएल 2022 या हंगामात नव्याने आलेल्या संघापैकी एक संघ म्हणजे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) होय. गुजरात संघाने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या हातात कर्णधारपदाची सूत्रे दिली होती. पंड्यानेही संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत संघाला पहिल्याच हंगामात यशाची चव चाखायला लावली. गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत पहिली ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यांनी आतापर्यंत फक्त 2 आयपीएल हंगाम खेळले आहेत. यामध्ये त्यांना पहिल्या हंगामात विजय, तर दुसऱ्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2023मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

7. डेक्कन चार्जर्स
आयपीएलच्या उद्घाटन हंगामाचा भाग असलेला संघ डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) हादेखील यशस्वी आयपीएल संघांच्या यादीत सामील आहे. विशेष म्हणजे, त्यांनी एकूण 5 हंगाम खेळले. त्यात त्यांना 1 वेळाच (2009 आयपीएल) विजेतेपद पटकावता आले. तसेच, त्यांनी 1 वेळा आयपीएलचा उपांत्य सामना खेळला. याव्यतिरिक्त त्यांना 3 वेळा साखळी फेरीपर्यंतचाच प्रवास करता आला. (most successful team in ipl csk on the top see list)

आयपीएल इतिहासातील आजपर्यंतचे सर्वात यशस्वी संघ
1
. चेन्नई सुपर किंग्ज
एकूण सीझन- 14
विजेतेपद- 5
उपविजेतेपद- 5
सेमीफायनलिस्ट- 1
प्ले-ॲाफ- 1
लीग स्टेज- 2

2. मुंबई इंडियन्स
एकूण सीझन- 16
विजेतेपद- 5
उपविजेतेपद- 1
प्ले-ॲाफ- 4
लीग स्टेज- 6

3. कोलकाता नाईट रायडर्स
एकूण सीझन- 16
विजेते- 2
उपविजेते- 1
प्ले-ॲाफ- 4
लीग स्टेज- 9

4. सनरायझर्स हैद्राबाद
एकूण सीझन- 11
विजेतेपद- 1
उपविजेतेपद- 1
प्ले-ॲाफ- 4
लीग स्टेज- 5

5. राजस्थान रॅायल्स
एकूण सीझन- 14
विजेते- 1
उपविजेते- 1
प्ले-ॲाफ- 3
लीग स्टेज-9

6. गुजरात टायटन्स
एकूण सीझन- 2
विजेते- 1
उपविजेते-1

7. डेक्कन चार्जर्स
एकूण सीझन- 5
विजेते- 1
सेमीफायनल- 1
ग्रुप स्टेज- 3

8- रॉयल चॅलेंजर बेंगलोर
एकूण सीझन- 16
उपविजेते- 3
प्ले-ॲाफ- 5
लीग स्टेज- 8

9. दिल्ली कॅपिटल्स
एकूण सीझन- 16
उपविजेते- 1
सेमीफायनल- 2
प्ले-ॲाफ- 3
लीग स्टेज- 10

10. किंग्ज पंजाब
एकूण सीझन- 16
उपविजेते- 1
सेमीफायनल- 1
लीग स्टेज- 14

11. रायझिंग पुणे सुपर जायंट्स
एकूण सीझन- 2
उपविजेते- 1
लीग स्टेज- 1

12. लखनऊ सुपर जायंट्स
एकूण सीझन-2
प्ले-ॲाफ- 2

13. गुजरात लायन्स
एकूण सीझन- 2
प्ले-ॲाफ- 1
लीग स्टेज- 1

14. पुणे वॅारीयर्स
एकूण सीझन-3
लीग स्टेज- 3

15. कोची टस्कर्स केरळा
एकूण सीझन- 1
लीग स्टेज- 1

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवाने खचला नाही हार्दिक पंड्या; धोनीबाबत मोठे विधान करत म्हणाला, ‘चांगल्या लोकांसोबत नेहमी…’
नाव मोठं, लक्षण खोटं! कोट्यवधी रुपये घेऊनही ‘हे’ 5 स्टार खेळाडू फ्लॉपच, इंग्लंडच्या 3 पठ्ठ्यांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---