रविवारचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरला. भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात रविवारी डबल हेडर सामने खेळवले गेले. रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रविंद्र जडेजाने केलेल्या अफलातून अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सला पराभवाचा धक्का दिला. एवढेच नाही तर या दिवसातील दुसरा सामनाही रोमांचकारी ठरला. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.
असा झाला रोमांचक सामना
दुसऱ्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानुसार दिल्लीने २० षटकात ४ बाद १५९ धावा करत हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात हैदराबादलाही ७ बाद १५९ धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवली गेली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून केन विलियम्सन आणि डेव्हिड वॉर्नरने अक्षर पटेलविरुद्ध ७ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ८ धावांचे लक्ष्य दिल्ली समोर होते. दिल्लीकडून हे आव्हान रिषभ पंत आणि शिखर धवनने सहज पार केले. त्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादकडून राशिद खानने गोलंदाजी केली.
सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी करणारे गोलंदाज
रविवारी दिल्लीविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये राशिद खानने गोलंदाजी केल्याने तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३ वेळा सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. जसप्रीत बुमराहने ४ वेळा आयपीएलमध्ये सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे.
तसेच या यादीत बुमराह आणि राशिद पाठोपाठ कागिसो रबाडा, मोहम्मद शमी आणि जेम्स फॉकनर आहे. या तिघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी २ वेळा सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे.
राशिद खान सुपर ओव्हरमध्ये…
राशिद खानने आत्तापर्यंत तीन वेळा हैदराबादकडून खेळतानाच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे तिन्हीवेळेला हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१९ सालच्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये राशिदने पहिल्यांदा गोलंदाजी केली होती.
त्यानंतर २०२० हंगामात त्यांना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. तर आता दिल्ली विरुद्ध देखील त्यानेच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. या तिन्ही सामन्यात सनरायझर्स हैदराबाद पराभूत झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
SRH vs DC : केन विलियम्सनचे अर्धशतक व्यर्थ; दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर रोमांचक विजय
विराटसाठी दुष्काळात तेरावा महिना! पराभवानंतर झाली ‘ही’ कारवाई
‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी करणारा जड्डू पहिला खेळाडू नाही, सीएसकेच्याच सहकाऱ्याने रचला होता इतिहास