लंडन। सोमवारी (१६ ऑगस्ट) भारताने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून दुसरा सामना लॉर्ड्सवर झाला. या सामन्यात भारताने १५१ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच काही खास विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाले आहेत.
लॉर्ड्सवरील तिसरा विजय
भारताचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील हा तिसरा कसोटी विजय ठरला. यापूर्वी भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८६ साली लॉर्ड्सवर पहिल्यांदा कसोटी सामना जिंकला होता. तर दुसऱ्यांदा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०१४ साली भारताने लॉर्ड्स कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला होता.
त्यामुळे इंग्लंडमधील मैदानांपैकी लॉर्ड्सवर भारताने सर्वाधिक विजय नोंदवले आहेत. लॉर्ड्स पाठोपाठ भारताने इंग्लंडमधील हेडिंग्ले आणि ट्रेंट ब्रिज मैदानावर प्रत्येकी २ विजय मिळवले आहेत.
भारताबाहेर या मैदानात भारताचे सर्वाधिक विजय
भारतीय संघाने मायदेशाबाहेर सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मिळवले आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो तो वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन व किंग्स्टनचा, तसेच श्रीलंकेतील कोलंबोचा आणि इंग्लंडमधील लॉर्ड्सचा. या चार ठिकाणी भारताने प्रत्येकी ३ कसोटी सामने जिंकले आहेत.
भारताने जिंकला सामना
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या १२९ धावांच्या शतकी खेळीच्या आणि रोहित शर्माच्या ८३ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या होत्या. तर, इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात कर्णधार जो रुटने केलेल्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या डावात भारतीय संघाची वरची आणि मधली फळी फारशी मोठी कामगिरी करु शकली नाही, केवळ अजिंक्य रहाणेने ६१ आणि चेतेश्वर पुजाराने ४५ धावांची खेळी करत झुंज दिली. पण, तळात फलंदाजीला आलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने नाबाद ८९ धावांची भागीदारी करत भारताला २९८ धावांपर्यंत पोहचवले. भारताने हा डाव घोषित करत इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले. या डावात शमीने नाबाद ५६ आणि बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. तर, इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
भारताने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात ५१.५ षटकात सर्वबाद १२० धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त जोस बटलर २५ आणि मोईन अली १३ यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
खट्याळ पंतसोबत खुद्द कर्णधारानेच केली मस्ती, भर मैदानात कानात अडकवलं ब्रेसलेट, पाहून खदखदून हसाल
Video: बुमराहला भिडली इंग्लंडची टीम, मग काय कर्णधार कोहलीने लॉर्ड्सच्या गॅलरीतूनच केली शिवागाळ






