Team India vs Sri Lanka Record :- श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर रविवारी (04 ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरीही, भारतीय संघाकडे मालिकेत पुनरागमन करण्याची शेवटची संधी आहे. बुधवारी (07 ऑगस्ट) भारत विरुद्ध श्रीलंका संघात वनडे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना होणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ वनडे मालिका 1-1 ने बरोबरीत तर सोडेलच पण याबरोबरच एक विश्वविक्रमही आपल्या नावावर करेल.
खरं तर, कोणत्याही संघाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघाला पराभूत करण्याचा विक्रम सध्या भारतीय संघाच्या नावावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध 169 वनडे सामने खेळले असून त्यापैकी श्रीलंकेचा 99 वेळा पराभव केला आहे. कोणत्याही संघाने विरोधी संघाला पराभूत केलेले हे सर्वाधिक सामने आहेत. जर आता भारतीय संघाने पुढील वनडे सामन्यात श्रीलंकेला हरवल्यास हा आकडा 100 पर्यंत वाढेल. वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 100 सामन्यांमध्ये एका संघाने दुसऱ्या संघाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडचा क्रमांक
भारत आणि श्रीलंकेनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विजयाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक येतो. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 96 वेळा न्यूझीलंडला पराभूत केले आहे, याचा अर्थ ऑस्ट्रेलिया देखील 100 चा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 93 वेळा श्रीलंकेचा पराभव करण्यात पाकिस्तानला यश आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचाही स्वतःचा थरार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडला 88 वेळा पराभूत केले आहे.
यानंतर पुन्हा भारतीय संघाचा क्रमांक लागतो. वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंत 84 वेळा पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने हरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनने जेव्हा द्रविडसमोरच केली त्याची नक्कल, माजी प्रशिक्षकाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं
IND vs SL कर्णधार रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘या’ 4 दिग्गजांना पछाडलं