महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात कोल्हापुर टस्कर्स व रत्नागिरी जेट्स हे संघ आमने-सामने आले. रत्नागिरी संघाने विजयासाठी दिलेले 177 धावांचे आव्हान कोल्हापूर संघाने 2 चेंडू व 4 गडी राखून पार केले. कोल्हापूर संघासाठी अनुभवी अंकित बावणे याने नाबाद शतक साजरे केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात सलामीचा फलंदाज धीरज फटांगरेला कोल्हापूरच्या मनोज यादवने दुसऱ्याच षटकात बाद केले, तेव्हा रत्नागिरी संघ १.३ षटकात १ बाद ९ अशा स्थितीत होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या प्रीतम पाटीलने तडाखेबंद फटकेबाजी करत अवघ्या ३२ चेंडूत ५ चौकार व ६ षट्काराच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली. प्रीतमला तुषार श्रीवास्तवने ४० चेंडूत ३२ धावांची संयमी खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ६२ चेंडूत ९३ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणून ठेवले. पण अखेर कोल्हापूरच्या फिरकीपटू तरणजीत ढिलोनने प्रीतमला बाद केले, ज्याचा डीप मिड विकेटला सचिन धसने सुंदर झेल टिपला.
त्यानंतर कोल्हापूर संघाच्या श्रेयस चव्हाण(१-२७), तरणजीत ढिलोन(१-२८) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत रत्नागिरीच्या फलंदाजांना फारशी फटकेबाजी करून दिली नाही. पण अखेरच्या षटकात रत्नागिरीच्या किरण चोरमले २७(१७,३x४), अझीम काझी नाबाद १८, निखिल नाईक नाबाद १६ यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला १७६ धावा उभारून दिल्या.
याच्या उत्तरात कोल्हापूर टस्कर्स संघाने षटकात बाद धावा करून हे आव्हान पूर्ण केले. वरच्या फळीतील फलंदाज केदार जाधव(६धावा), सचिन धस(१३धावा) हे दोघे झटपट बाद झाल्यामुळे कोल्हापूर संघ ७.१ षटकात २ बाद ४६ धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणेने सुरेख खेळी करत ६० चेंडूत ११चौकार व ४ षट्काराच्या मदतीने नाबाद १०५ धावांची शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला तरणजीत सिंह ढिलोन(२१धावा), सचिन धस(१३धावा), सिद्धार्थ मराठे १०(धावा) यांनी साथ दिली.
सहाव्या गड्यासाठी अंकित बावणेने तरणजीत सिंह ढिलोन(२१धावा)च्या साथीत २४ चेंडूत ४० धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अखेरच्या शतकात कोल्हापूर संघाला ६ चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती. अंकितने आपला अनुभव व कौशल्य याचा सुरेख संगम साधत दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत संघाला विजयाच्या आणखी नजीक नेले. त्यानंतर अंकितने एक धाव घेतली व ३ चेंडूत २ धावांची गरज असताना स्ट्राईकवर असलेल्या मनोज यादवने विजयी षटकार खेचला व संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अंकित बावणे ठरला.
अंकित यावेळी म्हणाला की, मी आखलेल्या रणनीतीनुसार माझा खेळ करू शकलो, याचा मला आनंद आहे. आजचा हा विजय माझ्या चाहत्यांसाठी समर्पित करतो.
धावफलक:
रत्नागिरी जेट्स: २० षटकात ४बाद १७६धावा (प्रीतम पाटील ६९(३२,५x४, ६x६), तुषार श्रीवास्तव ३२(४०,२x४), किरण चोरमले २७(१७,३x४), अझीम काझी नाबाद १८, निखिल नाईक नाबाद १६, श्रेयस चव्हाण १-२७, अक्षय दरेकर १-२६, तरणजीत सिंह ढिलोन १-२८) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स: १९.४ षटकात ६ बाद १८१ धावा(अंकित बावणे नाबाद १०५(६०,११x४,४x६), तरणजीत सिंह ढिलोन २१(१४), सचिन धस १३, सिद्धार्थ मराठे १०, मनोज यादव नाबाद ७, प्रदीप दाढे ३-३१, कुणाल थोरात १-२७, निकित धुमाळ १-२२); सामनावीर:-अंकित बावणे; कोल्हापूर टस्कर्स संघ ४ गडी राखून विजयी.
(MPL 2023 Kolhapur Tuskers Beat Ratnagiri Jets By 4 Wickets Ankeet Bawne Hits Century)
महत्वाच्या बातम्या –
नव्या जर्सीत फोटोशूट करताना टीम इंडियाने केली धमाल, व्हिडिओ पाहाच
महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी श्रीराम कॅपिटल्स मुख्य प्रायोजक