---Advertisement---

MPL 2025: आयपीएल गाजवणारे MPL चे शिलेदार

On: सोमवार, मे 26, 2025 4:36 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी खेळली जाईल. एमपीएल 2023 व एमपीएल 2024 यशस्वी ठरल्यानंतर सर्वांना तिसऱ्या हंगामाचे वेध लागले आहेत. एमपीएल 2025 मध्ये असे काही खेळाडू आहेत जे सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 मध्ये सहभागी झाले झालेले. त्याच खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.

एमपीएल 2025 मध्ये सामील होणारे सर्वात मोठे नाव निर्विवादपणे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचे आहे. ऋतुराज मागील 6 वर्षापासून आयपीएल मध्ये सहभागी होतोय. तसेच एमपीएलच्या तिसऱ्या हंगामातही तो पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्व करणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असलेला ऋतुराज हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने केवळ 5 सामने खेळू शकलेला. यामध्ये त्याने दोन अर्धशतकांसह 122 धावा केलेल्या. एमपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना ऋतुराज उपलब्ध नसला तरी, अखेरच्या टप्प्यात पुणेरी बाप्पा संघासाठी त्याची कामगिरी निर्णय ठरू शकते.

चेन्नई सुपर किंग्स संघासाठीच खेळणारा महाराष्ट्राचा माजी कर्णधार व सलामीवीर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) हा देखील एमपीएल खेळताना दिसेल. पहिल्या हंगामात नाशिक तर दुसऱ्या व तिसऱ्या हंगामात तो पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे नेतृत्व करेल.‌ राहुल याच्यासाठी आयपीएल 2025 तितकी खास राहिली नाही. त्याला चेन्नईसाठी पाच सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, तो केवळ 55 धावा करू शकला. यापूर्वी त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयपीएल 2025 च्या संग्रामात मैदानावर उतरण्याची संधी मिळालेला महाराष्ट्राचा तिसरा खेळाडू होता वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary). ऋतुराज व राहुल प्रमाणेच तो देखील चेन्नई सुपर किंग संघाचा भाग होता. मुकेश याला हंगामात फक्त दोन सामने खेळायला मिळाले. यामध्ये त्याने केवळ एक बळी मिळवला. असे असले तरी 2022 मध्ये आपल्या पहिल्या हंगामात खेळताना त्याने 16 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. यावर्षी तो पुन्हा एकदा ईगल नाशिक टायटन्स संघासाठी खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2025 च्या रणधुमाळीत महाराष्ट्राचे आणखी तीन खेळाडू सहभागी झाले होते. ते खेळाडू एमपीएल 2025 मध्ये देखील दिसणार आहेत. यापैकी रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) हा चेन्नई संघाचाच भाग होता. मात्र, चेन्नई संघ आता स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याला आपले आयपीएल पदार्पण करता येणार नाही.

चेन्नईसाठी खेळणाऱ्या या चार खेळाडूंव्यतिरिक्त‌ महाराष्ट्राचे दोन अष्टपैलू खेळाडू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) व‌ राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangrgekar) हे लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग आहेत. राजवर्धन आयपीएल 2023 व 2024 मध्ये चेन्नई संघासाठी काही सामने खेळलेला आहे. तर, अर्शिनने मागील वर्षी लखनऊसाठीच आयपीएल पदार्पण केले होते. मात्र, आयपीएल 2025 मध्ये त्यांना अद्याप एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. लखनऊ संघाचा अखेरचा साखळी सामना शिल्लक असल्याने, कदाचित या दोघांना संधी मिळू शकते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन करत आहे. संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 4 जून ते 24 जून या 20 दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल. एमसीए प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आयोजित करते आहे. या दोन्ही स्पर्धां JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरबसल्या सामने पाहता येतील. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---