यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना अनेक मोठे विक्रम केले आहे. याबरोबरच त्याने इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळतानाही अनेक विक्रम केले आहेत.
त्याचे आयपीएलमधील अनेक विक्रम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व मोसमात धोनीने चेन्नईचे नेतृत्व केले आहे. तसेच तो आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २००८ च्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. याला अपवाद फक्त २०१६ आणि २०१७ चा मोसम राहिला.
कारण या दोन मोसमांसाठी चेन्नई सुपर किंग्सवर स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चेन्नई या दोन मोसमांसाठी आयपीएमध्ये सहभागी झाले नव्हते. या दोन मोसमासाठी सामील झालेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट्स या नव्या संघाकडून धोनी खेळला. २०१८ ला चेन्नईने पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर धोनी पुन्हा चेन्नई संघात सामील झाला.
धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले असून ४०.९९ च्या सरासरीने ४६३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत. हे २०४ सामने खेळताना त्याने काही खास विक्रम केले, त्याचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. पाच वेगवेगळ्या क्रमांकावर अर्धशतके करणारा एकमेव खेळाडू –
एमएस धोनी २००८ पासून आयपीएल खेळत असून त्याने आत्तापर्यंत अनेक क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तो आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतके करणारा एकमेव फलंदाजही आहे. त्याने तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतक केले आहे. धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकून २३ अर्धशतके केली आहेत.
२. सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक –
धोनीला एक चपळ आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ओळखले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना अनेक विक्रम केले आहे. याबरोबरच त्याने आयपीएलमध्येही असेच विक्रम केले असून तो आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये १९७ सामन्यात यष्टीरक्षण केले असून यष्टीमागे १४८ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या १०९ झेलांचा आणि ३९ यष्टीचीतचा समावेश आहे.
३. सर्वाधिकवेळा फलंदाजांना यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक –
एमएस धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा विक्रम आहे. त्याने आत्तापर्यंत ३९ वेळा फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
४. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू –
धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमधील १३ मोसमातील १२ मोसमात नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व ११ मोसमात त्याने चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच २०१६ ला त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचेही नेतृत्व केले आहे. त्याने एकूण १८८ आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून यातील ११० सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे.
त्याने १०५ सामने चेन्नईचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. तर ५ सामने पुण्याचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. याबरोबरच धोनी हा सर्वाधिक आयपीएल सामन्यात नेतृत्व करणाराही कर्णधार आहे.
५. संघाच्या घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा पहिला कर्णधार –
चेन्नई सुपर किंग्सने २०११ च्या आयपीएल मोसमाचे विजेतेपद चेन्नई येथे त्यांच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळताना मिळवले होते. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले होते. त्यामुळे ज्या संघाचे नेतृत्व करतोय त्या संघाच्या घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा धोनी पहिला आणि सध्यातरी एकमेव कर्णधार आहे.
आयपीएलमध्ये २०१० ला सचिन तेंडुलकरला आणि २०१६ ला विराट कोहलीला असा विक्रम करण्याची संधी होती. मात्र त्या त्यांना अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
६. सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा खेळाडू –
एमएस धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंतच्या १३ आयपीएल मोसमांपैकी ९ मोसमात अंतिम सामना खेळला आहे. त्यातील ३ वेळा तो विजेत्या संघाचा भाग होता. धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना ८ वेळा अंतिम सामने खेळले आहे. तसेच १ वेळा रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून त्याने अंतिम सामना खेळला आहे.
७. स्वत:च्या प्रशिक्षकांचे नेतृत्व करणारा खेळाडू –
सध्या स्टिफन फ्लेमिंग हे चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मागील अनेक मोसमांपासून त्यांनी चेन्नईच्या प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळला आहे. विशेष म्हणजे २००८ ला ते चेन्नई सुपर किंग्सकडून १० सामने खेळाडू म्हणून खेळले आहेत. त्यावेळी ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले होते.
तसेच चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी ७ मोसमात खेळाडू म्हणून धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तर गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी ३ मोसमात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडू म्हणून खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासात ‘या’ ५ खेळाडूंना बाद देण्याच्या निर्णयामुळे झाले होते वाद
आगामी आयपीएलमध्ये ‘हे’ तीन मुंबईकर उडवू शकतात भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज