शारजाह। काल(२२ सप्टेंबर) आयपीएलच्या १३ व्या मोसमातील चौथा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थानने १६ धावांनी चेन्नईवर मात करत या मोसमातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांचा कर्णधार एमएस धोनीच्या फलंदाजीबद्दल बरीच चर्चा झाली.
राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या षटकांदरम्यान नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. परंतु त्यानंतरही फाफ डु प्लेसिसच्या फटकेबाजीमुळे चेन्नईला विजयाची आशा होती. परंतु याचवेळी धोनीने संथगतीने केलेल्या फलंदाजीमुळे अनेकांना आश्चर्यचकीत केले.
झाले असे की धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने त्याच्याआधी सॅम करन, केदार जाधव अशा खेळाडूंना फलंदाजी क्रमवारीत बढती दिली. पण ते देखील काही खास करु शकले नाही. हे दोघेही बाद झाल्यानंतर धोनी ज्यावेळी फलंदाजीला आला, त्यावेळी चेन्नईला १६.२६ च्या धावगतीने धावा करायच्या होत्या म्हणजेच ३८ चेंडूत १०३ धावा करायच्या होत्या.
पण अशा वेळी एका बाजूने डु प्लेसिस फटकेबाजी करत असताना धोनीने आक्रमकता न दाखवत १९ व्या षटकापर्यंच १२ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. त्यातच १९ व्या षटकात डु प्लेसिस ३७ चेंडूत ७२ धावा करुन बाद झाला होता. त्यामुळे अखेर २० व्या षटकात चेन्नईसाठी विजय आवाक्याबाहेर गेला. त्यांना शेवटच्या षटकात ३८ धावांची गरज होती. पण या षटकात धोनीने टॉम करनच्या गोलंदाजीवर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग ३ षटकार ठोकले आणि पराभवाचे अंतर कमी केले. परंतु धोनीने इतक्या उशीरा आक्रमकता दाखवल्याने अनेकांनी त्यावर टिका केली. कारण जर धोनीने १८ किंवा १९ व्या षटकात ही आक्रमकता दाखवली असती तर कदाचीत चेन्नईसाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला असता.
तसेच धोनीने ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याबदद्लही अनेकांची आश्चर्य व्यक्त केले. पण याबद्दलचे कारण देताना धोनीने सांगितले की ‘मी अनेक दिवस फलंदाजी केलेली नाही. १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याने जास्त मदतही मिळाली नाही. तसेच मला काही नवीन गोष्टी करुन पहायच्या होत्या. मला सॅम करनला संधी द्यायची होती.’
या आयपीएल मोसमासाठी युएईला आल्यानंतर प्रत्येक संघातील सदस्य ६ दिवसांसाठी क्वारंटाईन होते. परंतु चेन्नई संघातील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या संघाचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला होता. त्यामुळे चेन्नईने अन्य संघापेक्षा जवळपास १ आठवडा उशीरा सरावाला सुरुवात केली.
धोनीने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात १७ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ७२ धावा केल्या. ही खेळी त्याने ३७ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केली. पण त्याची ही खेळी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकली नाही.
तत्पूर्वी राजस्थानकडून संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने तुफानी फलंदाजी केली. त्याने ८ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१६ धावा केल्या होत्या.