---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपमध्ये ही एक गोष्ट भारताचं विजेतेपद हिरावू शकते, धोनीचं स्पष्ट मत; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 9:56 AM
---Advertisement---

आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार असून अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाईल. भारताला घरच्या मैदानावर सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. मजबूत संघरचनेमुळे टीम इंडियाला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारताच्या ताकदीकडे पाहता अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनीही भारत विजेतेपद पटकावू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू एमएस धोनीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. धोनीने भारताला सर्वात धोकादायक संघ म्हटले असले, तरी एका गोष्टीबाबत त्याने चिंता व्यक्त केली आहे.

जतिन सप्रू याच्याशी बोलताना धोनी म्हणाला, “भारताचा संघ सध्या सर्वात खतरनाक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये टीम इंडियाकडे जबरदस्त ताकद आहे. संघाकडे अनुभव आहे, विशेषतः टी20 फॉरमॅटमध्ये. दबावाच्या क्षणीही कामगिरी कशी करायची, हे खेळाडूंना चांगले माहीत आहे.” मात्र, याच वेळी धोनीने ओसबाबत (दव) चिंता व्यक्त केली. “माझ्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे ओस. मला ओस अजिबात आवडत नाही, कारण ती सामन्याचा संपूर्ण खेळ बदलू शकते,” असे धोनीने स्पष्ट केले.

तो पुढे म्हणाला, “मी खेळत असताना ओस पडेल की नाही, याची भीती नेहमी वाटायची. अशा परिस्थितीत नाणेफेक फार महत्त्वाची ठरते. जर आपण 10 सामने सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळलो, तर बहुतांश वेळा आपण जिंकू शकतो. पण टी20 क्रिकेट असे आहे की एखाद्या दिवशी आपले खेळाडू अपयशी ठरले आणि प्रतिस्पर्धी संघाचा दिवस चांगला गेला, तर निकाल उलटू शकतो. हे लीग स्टेजमध्येही होऊ शकते आणि नॉकआउटमध्येही.”

दरम्यान, भारताच्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या वेळापत्रकाकडे पाहिले तर टीम इंडिया 7 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. 12 फेब्रुवारीला नामिबियाशी सामना होईल, तर 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध सामना नियोजित आहे. मात्र, पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने हा सामना अनिश्चित आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला भारत आपला शेवटचा गट सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---