चेन्नई। रविवारी(31 मार्च) आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 8 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
त्याने या सामन्यात 46 चेंडूत 75 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र त्याला सामन्याच्या सहाव्या षटकातच तेही शून्य धावेवर असताना विचित्र पद्धतीने जीवदान मिळाले होते.
झाले असे की 6 व्या षटकात राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील चौथा चेंडू शॉर्ट लेन्थला टाकला. धोनीने बचावात्मक फटका खेळला, पण तो चेंडू धोनीच्या बॅटची कड घेऊन स्टंपच्या दिशेने गेला. मात्र स्टंपला चेंडू लागूनही बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे धोनीला जीवदान मिळाले.
पण असे जीवदान पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले होते. याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जोफ्रासह राजस्थानचा फलंदाज स्टिव्ह स्मिथही असे जीवदान पाहून चकीत झालेले दिसत आहेत.
हे धोनीचे जीवदान राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगलेच महागात पडले. कारण नंतर धोनीने त्याचे आयपीएलमधील 21 वे अर्धशतक पूर्ण केले. तसेच सुरेश रैना, ड्वेन ब्रावो यांना साथीला घेत चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 175 धावांचा टप्पाही गाठून दिला.
विशेष म्हणजे धोनीने 20 व्या षटकात जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर शेवटच्या तीन चेंडूत सलग तीन षटकारही मारले.
20 षटकात विजयासाठी चेन्नईने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 8 बाद 167 धावाच करता आल्या. राजस्थानकडून बेन्स स्टोक्सने 46 धावांची खेळी करत चांगली लढत दिली.
गोलंदाजीत राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आणि चेन्नईकडून दिपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्रावो या चौघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्मानंतर आता अजिंक्य रहाणेलाही झाला लाखो रुपयांचा दंड, जाणून घ्या कारण
–कोहलीच्या टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा कायम, सलग तिसऱ्यांदा पटकावली मानाची गदा






