आयपीएल २०२१ स्पर्धा झाल्यानंतर एमएस धोनी पुढीलवर्षी देखील आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार की नाही? हा प्रश्न सर्वंनाच पडला आहे. एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. तरीदेखील तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने शेवटचा सामना खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. दरम्यान, पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील नाणेफेक झाल्यानंतर एमएस धोनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धोनीला पुढे खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना धोनीने स्पष्ट केले की तो, आयपीएल २०२२ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासोबत असेल पण खेळाडू म्हणून असेल की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे.
धोनीने नाणेफेक झाल्यानंतर म्हटले की, “तुम्ही मला येणाऱ्या काळातही पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये पाहाल. परंतु, मी चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळणार की नाही, हे मला माहीत नाही. बऱ्याच अनिश्चित गोष्टी आहेत. आम्ही याची वाट पाहतोय, कारण दोन नवीन संघ जोडले जाणार आहेत. यामध्ये रिटेंशन पॉलिसीचा (खेळाडू संघात कायम ठेवण्याचा) समावेश असणार आहे. कोणालाच माहीत नाही की, किती भारतीय आणि विदेशी खेळाडूंना कायम करता येणार आहे. जोपर्यंत नियम काय आहेत याची घोषणा होत नाही, तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. म्हणून आम्ही सर्व वाट पाहतोय, अशी आशा आहे की, हे सर्वांसाठी चांगले असेल.”
धोनीने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, तो आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, तो आयपीएल २०२२ स्पर्धेत देखील चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करेल. परंतु, पंजाब किंग्स संघाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात त्याने जे वक्तव्य केले, त्यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो मेंटोर किंवा प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ शास्त्रीच नाही, तर ‘या’ सदस्याचा देखील टीम इंडियासोबतचा प्रवास टी२० विश्वचषकानंतर संपणार
कोलकाता वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
कोलकाता, मुंबई की पंजाब, कोण ठरणार प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ? पाहा कसे आहे समीकरण