मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बॅटची कड ही ४० किंवा त्यापेक्षा कमी मिलीमीटर असावी. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार एमएस धोनीची बॅट या नियमांत बसत नसल्या कारणाने ती त्याला बदलावी लागणार आहे.
विशेष म्हणजे या नियमानुसार बॅटमध्ये बदल कराव्या लागणाऱ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी हा एकमेव खेळाडू नसून त्यात ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल या स्फोटक फलंदाजांचाही समावेश आहे.
मेरीलेबोन क्रिकेट क्लब यावर्षी मार्च महिन्यात नवी नियमावली जाहीर केली असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. वॉर्नर, धोनी, गेल यांची बॅटची कड ही अंदाजे ५० मिलीमीटरच्या आसपास आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार त्यांना ही बॅट बदलावी लागणार आहे.
या फलंदाजाप्रमाणेच स्फोटक फलंदाज असणाऱ्या विराट कोहली. एबी डिव्हिलिअर्स यांच्या बॅटची कड ही मात्र नियमात बसणारी आहे. विराट कोहलीप्रमाणेच शिखर धवन, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा हे सर्वच खेळाडू नियमात बसणारी बॅट वापरत आहेत.
काही रिपोर्ट्स प्रमाणे सध्या धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे जो ४५ मिमी. कड असलेली बॅट वापरात आहे. वेस्ट इंडिजच्या पोलार्डने आयपीएलवेळीच आपली बॅट बदलली आहे.