भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे १२ हंगामात नेतृत्व केल्यानंतर कर्णधारपद सोडले आहे. त्याने संघाला आयपीएलची चार विजेतेपदे जिंकून दिली आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा उपविजेत ठरला आहे. धोनीने आयपीएलला २ दिवस उरले असताना अचानक कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि रवींद्र जडेजा सीएसकेचा नवा कर्णधार झाला आहे. धोनीने जडेजाची निवड केल्याचे चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने म्हणले, असले तरी माही संघाचे प्रतिनिधित्व करत राहील.
सीएसके (CSK) फ्रँचायझीने निवेदनात म्हणले की, “महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने जडेजाची संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे. धोनी या हंगामात आणि त्यानंतरही सीएसकेचे प्रतिनिधित्व करत राहील.” जडेजा २०१२ पासून सीएसकेचा एक भाग आहे आणि सीएसकेचे नेतृत्व करणारा तो तिसरा खेळाडू असेल.
सीएसकेलाही धोनीचे (MS Dhoni) कर्णधारपद सोडण्याची कल्पना नव्हती. फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, धोनी आजच ही घोषणा करेल याची मला कल्पना नव्हती. विश्वनाथन यांनी धोनीच्या निर्णयावर विश्वास व्यक्त केला. धोनीने निर्णय घेतला तर ते संघाच्या हिताचे असेल, असे ते म्हणाले.
विश्वनाथन म्हणाले, “पाहा, धोनी जो काही निर्णय घेईल तो संघाच्या हिताचा आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करण्यासारखे काही वाटत नाही. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत आला आहे. तो आमच्यासाठी मार्गदर्शक आहे आणि यापुढेही मार्गदर्शक असेल.”
काशी विश्वनाथन यांना २०२२चा आयपीएल हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल का, असे विचारले असता ते म्हणाले, “मला वाटत नाही की, हा त्याचा शेवटचा हंगाम असेल. जोपर्यंत तो फिट आहे, तोपर्यंत त्याने खेळावे अशी आमची इच्छा आहे. मला हे माहित नाही की त्याला काय वाटते. धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, असे म्हणू शकत नाही. धोनीची फलंदाजी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. या मोसमातील कामगिरी धोनीच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगून जाईल. असो, धोनीने धावांचा पाऊस पाडला तरी तो निवृत्त होऊ शकतो.”
जडेजाच्या कर्णधारपदी नियुक्तीबद्दल विश्वनाथन यांनी आशा व्यक्त केली की, अष्टपैलूच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल. ते म्हणाले, “जड्डू चांगले नेतृत्व करेल. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. जडेजा १० वर्षांपासून आमच्यासोबत आहे आणि त्याला संघ संस्कृती चांगलीच समजते.”
आता २ दिवसांनी २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जड्डूचा ‘सर’ जडेजा करण्यात माही भाईचाच आहे सिंहाचा वाटा; बोटाला धरून शिकवलंय
गेली १२ वर्षे धोनीच होता सीएसकेचा संघनायक, पण त्याने ‘या’ खेळाडूच्या कॅप्टन्सीखाली खेळलाय एक सामना
थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा