रविवारी(3 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या वनडेत 35 धावांनी विजय मिळवला आणि 5 सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा चक्क मराठीतून केदार जाधवला सल्ला देताना दिसला. धोनीने न्यूझीलंडकडून मिशेल सँटेनर आणि टॉड ऍस्टल फलंदाजी करत असताना 39 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या केदार जाधवला ‘पुढे नको भाऊ…घेऊन टाक’ असा मराठीतून सल्ला दिला आहे.
धोनीने दिलेल्या या सल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/RealShishupal/status/1091987420231491585
न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या वनडेत धोनीचा मराठमोळा अंदाज पाहून केदारलाही आश्चर्य वाटल्याचे त्याने सांगितले आहे. केदारने ट्विट केले आहे की, ‘परदेश दौऱ्यात जेव्हाही धोनी यष्टीमागे असतो तेव्हा मायदेशातील आठवण करुन देतो. पण हा क्षण माझ्यासाठीही आश्चर्यकारक होता.’
धोनी नेहमीच युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव अशा युवा गोलंदाजांना यष्टीमागून हिंदीमध्ये मार्गदर्शन करत असतो. त्याचे सल्ले अनेकदा स्टम्प माईकच्या माध्यमातून सर्वांना ऐकूही येतात. तसेच हे युवा खेळाडूही त्यांच्या यशाचे श्रेय अनेकदा धोनीला देत असतात.
You always feel at home on foreign tours when @msdhoni is behind the stumps… But This moment came as a real surprise…#घेऊन_टाक https://t.co/AhXAwjeFiK
— IamKedar (@JadhavKedar) February 3, 2019
या सामन्यात धोनीने 37 व्या षटकात केदार जाधवच्या गोलंदाजीवर जिमी निशाम याला धावबादही केले. त्यावेळी केदार आणि धोनीने निशाम पायचीत असल्याचे अपील केले होते. पण पंचांनी त्याला नकार दिला. यावेळी निशामचे पंचाकडेच लक्ष असल्याने आणि तो क्रिजच्याही बाहेर असल्याने चतूर धोनीने चपळाईने त्याला धावबाद केले.
MS Dhoni's stunning run out act today at a crucial juncture of the ODI against New Zealand ..Wawwwwwwwww👋👋#cricket #MSDhoni #BCCI #CricketMeriJaan #CricbuzzLIVE pic.twitter.com/dREnLZvJvT
— KS Praveen (@beingksp) February 3, 2019
धोनीला फलंदाजीत मात्र या सामन्यात खास काही करता आले नाही. पण केदारने अंबाती रायडूची चांगली साथ देताना सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चार विकेट्स 18 धावांवर गमावल्यानंतर रायडू (90), विजय शंकर(45), हार्दिक पंड्या(45) आणि केदार जाधव(34) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर 252 धावांचा टप्पा गाठला.
तसेच भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्याने न्यूझीलंडला 44.1 षटकात सर्वबाद 217 धावांवर रोखण्यात भारताला यश आले. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 आणि भुवनेश्वर कुमारने 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज
–कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम
–एमएस धोनीसाठी न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे या कारणामुळे ठरला खास