शनिवारी आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात झालेल्या सामन्याने झाली. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला होता. त्यानंतर तो 14 महिन्यांनंतर काल व्यावसायिक क्रिकेट खेळला.
एमएस धोनी सामन्यात मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता. नाणेफेक होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, सामना रेफरी आणि तो स्वतः सोशल डिस्टंसींगचे पालन करतांना दिसले. त्यावेळी तो म्हणाला की, “सोशल डिस्टंसींगमुळे आपण आयपीएलमध्ये पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवू शकू की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे.” धोनीच्या या प्रश्नामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
धोनी दिसला वेगळ्या लूकमध्ये
14 महिन्यांनंतर धोनी सामना खेळत होता. तो एका नव्या लूकमध्ये दिसला. त्याने त्याची दाढी यावेळी वेगळ्या लूकमध्ये ठेवली होती. तंदुरुस्तीबद्दल विचारले असता धोनी म्हणाला की “लॉकडाऊन दरम्यान स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बराच वेळ मिळाला होता. त्यावेळी मी जास्त धावू शकलो नाही परंतु जिममध्ये व्यायाम करण्यासाठी 4-5 महिन्यांचा पूर्ण वेळ मिळाला होता.”
क्वारंटाईनचे पहिले 6 दिवस होते अत्यंत कठीण
धोनी म्हणाला की, “संघातील प्रत्येक सदस्याचे कौतुक केले पाहिजे. क्वारंटाईनचे पहिले 6 दिवस खूप कठीण होते. मला आशा आहे की प्रत्येक खेळाडूने वेळेचा सदउपयोग केला असेल. कुटुंबासमवेत 4-5 महिने घालवल्यानंतर अशा नवीन नियमांमध्ये येऊन राहणे कठीण आहे.”
मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई संघाचा मागील चार सामन्यात पराभव झाला होता. त्याबद्दल बोलतांना धोनी म्हणाला, “हा जेंटलमॅनचा खेळ आहे आणि हरल्यानंतर आपण आपल्या उणीवांचा विचार करतो, बदला घेण्याबद्दल नाही.”
रोहित म्हणाला- आम्ही विक्रम सुधारु
मागच्या वेळी मुंबई इंडियन्स संघाची यूएईमधील कामगिरी खराब होती. संघाला सर्व 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. युएईतील मुंबई इंडियन्सच्या खराब विक्रमाबद्दल संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “गेल्या वेळी इथे खेळलेले फक्त 2 खेळाडू यावेळी आमच्या संघात आहेत. यावेळी आम्ही एक नवीन संघ घेऊन मैदानात आलेलो आहोत. आशा आहे की आम्हाला आमचा खराब विक्रम सुधारण्यात यश येईल.”
स्पर्धेत धोनीने केल्या 4432 धावा
आयपीएलमध्ये धोनीने 190 सामन्यांत 42.21 च्या सरासरीने 4432 धावा केल्या. तो या स्पर्धेत एकमेव खेळाडू आहे ज्याने 9 वेळा अंतिम सामना खेळला आहे आयपीएलमध्ये यष्टीरक्षक धोनीने सर्वाधिक 132 खेळाडूंना बाद केले. या दरम्यान त्याने यष्टींमागे 96 झेल घेतले आणि 38 यष्टिचित केले आहे.