भारताचे दिग्गज कर्णधार म्हटलं की एमएस धोनी नेहमीच प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येतो. रांची सारख्या छोट्या शहरातून सुरु झालेला धोनीचा प्रवास भारताचा यशस्वी कर्णधारापर्यंत झाला. डिसेंबर २००४ ला पदार्पण केलेल्या धोनीने अनेकदा त्याच्या आक्रमक खेळीने भारताला मोठे विजय मिळवून दिले.
एवढेच नाही तर त्याने यष्टीरक्षणातही चांगली कामगिरी केली. त्याच्या या प्रवासात त्याने अनेक मोठे विक्रम केले. त्याचे काही विक्रम असे आहेत, जे मोडणे कठिण आहेत. अशा विक्रमांचा घेतलेला आढावा –
एमएस धोनीचे हे ५ विक्रम मोडणे कठीण –
१. आयसीसीच्या सर्व ३ स्पर्धांचे विजेतेपदे जिंकणारा एकमेव कर्णधार –
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या. यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ३ आयसीसीच्या मोठ्या जिंकण्याची कामगिरी केली. धोनीला नवीनच कर्णधारपद मिळालेले असताना त्याच्या नेतृत्वाखाली प्रथम भारताने २००७ चा टी२० विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेला झालेल्या त्या विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले होते.
त्यानंतर २०११ ला धोनीने पहिल्यांदा वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले. त्या विश्वचषकात भारताने २ एप्रिलला श्रीलंकेला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली ही आयसीसीची दुसरी स्पर्धा होती.
या विश्वचषकानंतर २ वर्षांनी जून २०१३मध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने कर्णधार म्हणून जिंकलेली ही आयसीसी स्पर्धेचे तिसरे विजेतेपद होते. त्यामुळे आयसीसीच्या ३ वेगवेगळ्या स्पर्धांचे विजेतेपद जिंकणारा धोनी पहिलाच आणि सध्यातरी एकमेव कर्णधार आहे.
२. सहा टी२० विश्वचषकात नेतृत्व –
२००७ ला दक्षिण आफ्रिकेत पहिला टी२० विश्वचषक खेळवला गेला. त्यावेळी युवा खेळाडू एमएस धोनीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानेही ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि त्याच्या नेतृत्वखाली भारताने तो विश्वचषक जिंकला. त्यानंतर झालेल्या सर्व ५ आयसीसी टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले.
त्यामुळे धोनी ६ टी२० विश्वचषकात नेतृत्व करणारा पहिला कर्णधार ठरला. त्याने २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४ आणि २०१६ अशा ६ टी२० विश्वचषकात नेतृत्व केले आहे. सध्यातरी ६ टी२० विश्वचषकात नेतृत्व करण्याचा विश्वविक्रम धोनीच्याच नावावर आहे.
३. कमी डावात आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारा खेळाडू –
२३ डिसेंबर २००४ ला बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केलेला एमएस धोनीने सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची, पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी केली. त्यामुळे तो केवळ ४२ डाव खेळल्यानंतर वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला होता.
त्यामुळे वनडेच्या फलंदाजी क्रमवारीत सर्वात जलद अव्वल क्रमांक मिळवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. जवळजवळ १५ वर्षांनंतरही हा विक्रम अजूनही कोणाला मोडता आलेला नाही.
४. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत –
धोनी फक्त एक चांगला कर्णधार, खेळाडू म्हणूनच नाही तर एक उत्तम यष्टीरक्षक म्हणूनही ओळखला जातो. त्याची वेगाने यष्टीचीत करण्याची शैली प्रसिद्ध आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ ते २०१९ दरम्यान ५३८ सामने खेळताना १९५ यष्टीचीत केले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक आहे.
या यादीत त्याच्या पाठोपाठ कुमार संगकारा आहे. संगकाराने १३९ यष्टीचीत केल्या आहेत. तसेच सध्या खेळत असलेल्या यष्टीरक्षकांमध्ये अनेकजणांनी ६० यष्टीचीतही केलेले नाहीत. त्यामुळे धोनीचा हा विक्रम एखाद्या यष्टीरक्षकाला मोडण्यासाठी कठीण आहे.
५. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने –
भारताला २ विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३२ सामन्यात नेतृत्व केले आहे. धोनीने पहिल्यांदा २००७च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याने १० वर्षे भारताचे नेतृत्व केले.
त्याने डिसेंबर २०१४ मध्ये भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तर जानेवारी २०१७ मध्ये त्याने मर्यादीत षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचेही कर्णधारपद सोडले. त्याने नेतृत्व केलेल्या ३३२ सामन्यांपैकी १७८ सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत ३२४ सामन्यांसह रिकी पाँटिंग आहे.
तसेच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करत असलेल्या कर्णधारांमध्ये विराट कोहली, ओएन मॉर्गन आणि केन विलियम्सन या यादीत अनुक्रमे १२, १६ आणि २२ व्या क्रमांकावर आहे. विराटने १८१ सामन्यात नेतृत्व केले आहे. मॉर्गनने १६० सामन्यात नेतृत्व केले आहे. तर विलियम्सनने १५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यामुळे धोनीचा हा विक्रम देखील मोडणे सध्या तरी कठीण आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
कोरोनामुळे लोकं बसलीय घरात, जडेजा झालाय घोड्यावर स्वार
प्रो कबड्डी प्लेअरने लॉकडाऊनच्या काळात गरिबांना केली अशी मदत…