---Advertisement---

….म्हणून विदेशात पंतला द्यावी प्रथम पसंती; माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांचे मत

On: सोमवार, डिसेंबर 21, 2020 3:24 PM
---Advertisement---

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. विशेषतः फलंदाजांचे अपयश पहिल्या सामन्यात ठळकपणे दिसून आल्याने पुढील सामन्यांसाठी संघात बदल करण्याची मागणी केली जात आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार असल्याने फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडूंनी विविध पर्याय सुचवले आहेत.
भारताचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही असाच एक पर्याय सुचवला आहे. त्यांनी आगामी सामन्यांसाठी यष्टीरक्षकाच्या जागेवर वृद्धिमान साहाच्या ऐवजी युवा रिषभ पंतला संधी देण्यात यावी, असे सुचविले आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलियात पंतला असावी पसंती 
पीटीआयशी बोलताना प्रसाद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “ज्यावेळी मी निवड समितीचा प्रमुख होतो त्यावेळी आमच्या निवड समितीने इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खेळताना रिषभ पंतला यष्टीरक्षकाच्या जागी प्रथम पसंती देण्याचे स्पष्ट धोरण ठेवले होते. कारण या देशांमध्ये तुम्हाला एका अधिकच्या फलंदाजाची गरज असते. भारतीय उपखंडात मात्र सहाव्या क्रमांकानंतर फलंदाजांची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे तुम्ही विशेषज्ञ यष्टीरक्षक खेळवू शकतात.”
रिषभ पंतच्या कामगिरीबद्दल बोलताना ते म्हणाले, “पंतने गेल्या काही महिन्यात आपल्या तंदुरुस्तीवर काम नक्कीच केले असेल. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात तो उत्तम लयीत दिसला होता. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिल्यास मला कोणतेही आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना तो दमदार कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.”

भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळविण्यात येईल. विराट कोहली मायदेशात परतत असल्याने अजिंक्य रहाणे उर्वरित मलिकेसाठी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पहिल्या सामन्यातील लज्जास्पद पराभावातून सावरत भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करेल का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.

संबधित बातम्या:
बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीच्या मॅन ऑफ द मॅचला मिळणार खास मुलाग मेडल; जाणून घ्या मेडलची विशेषता
– टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करणे कठीण, पाहा काय सांगते आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---