जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. खेळाडूंचे रिटेंशन व ड्राफ्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेगा लिलाव बंगळुरूमध्ये १२ व १३ फेब्रुवारी रोजी पार पडेल. त्याच वेळी आता आयपीएलच्या तारखांविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येतेय.
या दिवशी सुरू होऊ शकते आयपीएल
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल २०२२ ची सुरुवात मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २७ मार्च रोजी होऊ शकते. तसेच, स्पर्धेतील सामने हे मुंबई व पुणे येथे खेळले जाऊ शकतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विना प्रेक्षक केवळ या दोन शहरात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या शनिवारी (२२ जानेवारी) झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
अनेक स्टेडियमचा पर्याय उपलब्ध
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात आयपीएल खेळणे निश्चित झाले तर, याचा बीसीसीआयला नक्कीच फायदा होईल. कारण, या दोन्ही शहरात मिळून चार दर्जेदार स्टेडियम आहेत. एकट्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडीयम अशी तीन आंतरराष्ट्रीय सुविधांनी युक्त स्टेडियम उपलब्ध आहेत. तर, पुण्याच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. या दोन्ही शहरातील अंतर जास्त नसल्याने बीसीसीआयला ही स्पर्धा यशस्वी करण्यात अतिरिक्त अडचणी येणार नाहीत.
आयपीएल २०२१ ची अशाच पद्धतीने झाली होती सुरुवात
आयपीएलचा मागील हंगाम अशाच प्रकारे खेळला केला होता. स्पर्धेचा पूर्वार्ध कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, मुंबई, दिल्ली व कोलकाता या ठिकाणी खेळला गेलेला. तर, उत्तरार्ध संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी व शारजा या शहरांमध्ये संपन्न झाला. याआधी आयपीएल २०२० संपूर्णपणे संयुक्त अरब अमिरात येथे पार पडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयकडून महत्वाची बैठक आयोजित, आयपीएल २०२२ विषयी होणार ‘हे’ निर्णय (mahasports.in)