मुंबई। अशोक मंडळ, सिद्धीप्रभा फौंडेशन, जय दत्तगुरु(अ), वीर संताजी, विजय क्लब(ब), जय भारत यांनी मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” चौथ्या फेरीत प्रवेश केला. ना.म. मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या कुमारांच्या तिसऱ्या फेरीत अशोक मंडळाने यंग प्रभादेवी(अ) मंडळाचे आव्हान ३७-२६ असे संपविले. सूरज सुतार, तेजस सुतार यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळाने अशोक मंडळाने पहिल्या डावातच १७-०९अशी आश्वासक आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात तिसऱ्या चढाईवर भर देत संयमाने खेळ करीत हा विजय साकारला. दुसऱ्या डावात यंग प्रभादेवीच्या ऋषभ मिश्रा, यश पवार यांना सूर सापडल्यामुळे थोड्या चकमकी पहावयास मिळाल्या. पण त्या विजय मिळविण्यास पुरेशा नव्हत्या.
सिद्धीप्रभा फौंडेशनने ५-५ चढायांच्या डावात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सचा कडवा प्रतिकार ४८-४५(८-५) असा मोडून काढत आपली घोडदौड सुरूच ठेवली. विशाल चौरसिया, विशाल घाडगे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सिद्धीप्रभाने पूर्वार्धात २७-१७अशी १०गुणांची मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात गुड मॉर्निंगच्या हर्षवर्धन नवाळे, साईराज जांभळे यांनी टॉप गिअर टाकत जोरदार खेळ करीत संघाला पूर्ण डावात ४०-४० अशी बरोबरी साधून दिली. परंतु ५-५ चढायांच्या डावात मात्र त्यांना ८-५ अशी ३गुणांनी हार पत्करावी लागली.
जय दत्तगुरू(अ)ने अमर संदेशचा संघर्ष ४३-३२ असा संपविला. जय दत्तगुरुकडून दीपेश चव्हाण, आकाश उपाध्याय, तर अमर संदेश कडून करण रावत, अभिषेक जोशी उत्कृष्ट खेळले. वीर संताजी मंडळाने कुणाल शेलार, अनिकेत पिंपरे यांच्या झंजावाती खेळाच्या बळावर दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सचा ४५-३५ असा पाडाव केला. शुभम साळुंखे, यश पाटील यांचा खेळ कोंडदेव स्पोर्ट्सचा पराभव टाळण्यास कमी पडला. इतर सामन्यात विजय क्लबने विजय माझगावचा ३३-१३ असा, तर जय भारताने साईकृष्ण मित्र मंडळाचा ४४-२२ असा पराभव करीत चौथ्या फेरीत आगेकूच केली.