भलेही क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात फलंदाजांचा जास्त दबदबा पाहायला मिळत असला, तरी गोलंदाजही बऱ्याचदा फलंदाजांच्या एकामागोमाग दांड्या उडवत सामन्याचा कायापालट करताना दिसतात. जगप्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगमध्येही ही गोष्ट अनुभवायला मिळते. लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, ड्वेन ब्रावो अशा गोलंदाजांची काही खेळाडूंनी तर धसकीच घेतलेली असते. आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजही सर्वांना पुरुन उरणारे आहेत.
या लेखात आम्ही आयपीएल २०२०च्या पूर्ण हंगामात मुंबई इंडियन्सकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
आयपीएल २०२०मधील मुंबई इंडियन्सचे पाच सर्वोत्तम गोलंदाज-
१) जसप्रीत बुमराह –
२०१३ साली मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून हा वेगवान गोलंदाज मुंबईच्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख बनला आहे. बुमराहच्या वेगवान गोलंदाजीने मोठ्या दिग्गजांनाही घाम फुटतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुमराहने त्याच्या गोलंदाजीचा धाक कायम ठेवला आहे. आयपीएल २०२०मध्ये पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या कागिसो रबाडाला तो काट्याची टक्कर देत आहे.
या हंगामात त्याने १४ सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्त्व केले असून २७ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ६.७१ इतका राहिला आहे.
२) ट्रेंट बोल्ट –
एकेकाळी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची कमान सांभाळत असलेल्या ट्रेंट बोल्टला यावर्षी मुंबई इंडियन्सने ट्रेड करत संघात सामील केले. तसे तर गेल्या २ वर्षांतील बोल्टची आकडेवारी काही खास राहिली नव्हती. अशात बोल्टला संघात सहभागी करणे आपल्याला तोट्याचे तर ठरणार नाही ना? अशी भीती कुठे-ना-कुठे संघाला वाटत होती. परंतु बोल्टने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले.
या हंगामात त्याने मुंबईकडून १४ सामने खेळले असून त्यात त्याने २२ विकेट्स घेतल्या आहेत. यासह यंदा मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दूसरा, तर पूर्ण आयपीएलमध्ये तिसरा गोलंदाज ठरला आहे.
३) राहुल चाहर –
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहरच्या बाबतीत आयपीएलच्या तेराव्या हंगामात घडलेल्या २ क्षणांना कोणताही चाहता क्वचितच विसरु शकेल. एक म्हणजे, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात भाऊ दीपक चाहरची राहुलने घेतलेली विकेट आणि क्वालिफायर १ सामन्यात केलेली महागडी गोलंदाजी. परंतु, चढ-उतारांना सामोरे जात राहुलने या हंगामात १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ८.१६ इतका राहिला आहे.
४) जेम्स पॅटिन्सन –
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याचे आयपीएलमधील हे पहिलेच वर्ष आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या उद्घाटन सामन्यातून त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. तेव्हापासून पॅटिसनला मुंबईच्या १० सामन्यात अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले आहे. त्यात त्याने ९.०१च्या इकोमॉनी रेटने ११ विकेट्स घेतल्या आहेत.
५) कृणाल पंड्या –
कृणाल पंड्या गेल्या ४ वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात आपले योगदान देत आहे. यंदा त्याने १५ सामने खेळले असून ६ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ७.४२ इतका राहिला आहे.
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
भावा तु संघात असलास की दिल्लीचे चाहते शेवटपर्यंत निवांत असतात; पाहा कोण आहेत दिल्लीचे संकटमोचक
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी