पुणे: 1992 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध जोंटी रोडसने हवेत झेप घेत केलेला अफलातून “रन आऊट” क्रिकेट शौकिनांच्या कायमच स्मरणात राहील. क्रिकेट मधील सार्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी कीर्ती मिळवणाऱ्या जोंटी रोडसने अल्टीमेट खो खो लीग स्पर्धेतील पुनीत बालन, जान्हवी धारिवाल-बालन व बादशहा यांच्या मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाच्या खेळाडूंना डायव्हिंगचे धडे दिले.
सध्याच्या सुरू असलेल्या अल्टीमेट खो खो लीग स्पर्धेत स्काय डाईव्ह आणि पोल डाईव्ह ही दोन कौशल्ये अत्यंत निर्णायक ठरत आहेत. जोंटी रोडसने खेळाडूंशी संवाद साधताना या दोन कौशल्यांबाबत त्यांना बहुमोल सूचना केल्या.
माझी संपूर्ण कारकीर्द हवेत झेप घेतच गेली त्यामुळे त्यासाठी काय करायला हवे मला नीट माहीत आहे असे सांगून रोडस म्हणाला की, तुम्ही सूर मारताना स्वतःला पूर्ण झोकून दिले नाही तर दुखापत निश्चित ठरते. मला माझ्या कारकिर्दीत सूर मारण्यासाठी पोलचा आधार मिळत नव्हता त्यामुळे मला हवेतच झेप घ्यावी लागत होती. पण प्रत्येकाला ते साध्य होत नाही.एका जागेवर उभे असताना झेल घेणे सोपे असते. परंतु सूर मारून झेल घेणे हे वेगळेच कौशल्य असते.
मी तरुण असताना मी सुद्धा खो खो खेळलो आहे. परंतु त्यावेळेला इतके नियम नव्हते, असे सांगून रोडस पुढे म्हणाला की, तुम्ही लोकांनी खेळ आमूलाग्र बदलून टाकला आहे. विजय मिळवणे महत्वाचे असते, परंतु ते अंतिम ध्येय नव्हे. आजूबाजूच्या इतरांनाही प्रेरणा देणे तितकेच महत्त्वाचे असते.
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना रोडस म्हणाला की, या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सूर मारणे या कौशल्याचा अवलंब करावा असे सांगण्याकरिता मी आलेलो नाही.डायव्हिंग करणे हे दिसायला सोपे असते. पण तुमच्या शरीरावर त्याचे अनेक परिणाम होतात. सुदैवाने या खेळाडूंना त्याची पूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे या खेळाडूंबद्दल मला आदरच वाटतो.
यावेळी बोलताना मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री म्हणाले की, एका सर्वोत्तम खेळाडूंकडून डायव्हिंगचे धडे शिकायला मिळणे हे या खेळाडूंसाठी भाग्याचेच आहे. डायव्हिंग हा खो खो चा अत्यंत महत्त्वाचा घटक असून जोंटीसारख्या महान खेळाडूकडून त्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन मिळणे या खेळाडूंवर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरेल.
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व