यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. तसेच २३ ऑक्टोबर पासून या स्पर्धेतील सुपर-१२ सामन्यांचा थरार सुरू होणार आहे. दरम्यान मंगळवारी (१९ ऑक्टोबर) पात्रता फेरीतील सामन्यात ओमान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात बांगलादेश संघाने २६ धावांनी विजय मिळवला. या दरम्यान बांगलादेश संघाचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानने अविश्वसनीय झेल टिपला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
ओमान संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५४ धावांची आवश्यकता होती. तर झाले असे की, बांगलादेश संघाकडून गोलंदाजी करताना १२ वे षटक टाकण्यासाठी मेहदी हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ओमान संघाचा कर्णधार जीशन मक्सुदने मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला कारण चेंडूला उंची खूप मिळाली परंतु लांबी हवी तशी मिळाली नाही.
त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मुस्तफिजुर रहमानने झेल टिपण्यासाठी धाव घेतली. चेंडू इतका उंच गेला होता की, कमी प्रकाशामुळे मुस्तफिजुर रहमानला चेंडू कुठे जाईल याचा अंदाज आला नाही. परंतु शेवटच्या क्षणी मुस्तफिजुर रहमानने डाव्या दिशेने डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. मुस्तफिजुर रहमानने टिपलेला हा भन्नाट झेल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित सर्वच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CVN-RpqljPa/?utm_medium=copy_link
बांगलादेश संघाचा जोरदार विजय
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून मोहम्मद नईमने तुफानी खेळी करत ६४ धावा केल्या. तर शाकिब अल हसनने ४२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाला २० षटक अखेर सर्वबाद १५३ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ओमान संघाकडून जतिंदर सिंगने ४० धावांची खेळी केली होती. तर कश्यप कुमार हरीश भाईने २१ धावांची खेळी केली. परंतु ओमान संघाला दिलेले आव्हान गाठता आले नाही. बांगलादेश संघाने या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
आपल्याच चेंडूवर झेल पकडण्यासाठी गोलंदाज बनला ‘सुपरमॅन’, खतरनाक कॅचचा व्हिडिओ व्हायरल
मॉर्गनचा ‘डबल स्टँटर्ड’! खराब फॉर्मात असूनही केकेआरसाठी खेळला, पण इंग्लंडसाठी वेगळा मार्ग अवलंबला
माही जैसा कोई नहीं…! केएल राहुलने सांगितले एमएस धोनीचे ड्रेसिंग रूममध्ये असण्याचे महत्त्व






