भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. इंग्लंडचे माजी खेळाडू आपल्या संघातील खेळाडूंना सतत मार्गदर्शन करत आहेत. यातच आता इंग्लडचा माजी कर्णधार नासीर हुसेनची भर पडली आहे. आगामी मालिकेच्या संदर्भात त्याने आपल्या संघाला भारतीय संघापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
पुढील महिन्यात सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
नासिर हुसेनने दिल्या इंग्लंड संघाला सूचना
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने या मालिकेविषयी एका खासगी प्रसारण वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत हुसेन याने इंग्लंड संघाला काही सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, “विराट कोहलीने भारतीय संघात कधीही हार न मानण्याची वृत्ती वाढवली आहे. भारतीय संघातील खेळाडू मैदानात किंवा मैदानाच्या बाहेरही विचलित होत नाहीत. विराट कोहलीची अनुपस्थिती व प्रमुख खेळाडूंच्या दुखापती यानंतरही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक मालिका विजय मिळवला आहे. पिछाडीवरून मालिका विजय मिळवणे मोठी गोष्ट असते.”
इंग्लंड संघाने चूक करू नये
हुसेन यांनी पुढे म्हटले, “इंग्लंड संघाने कोणतीही चूक करू नये. सध्या भारत एक मजबूत संघ आहे. मायदेशात तर त्यांना हरवणे कठीण असते. इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळवला असला तरी गाफील राहता कामा नये. पहिल्या कसोटीसाठी सर्वोत्तम एकादश निवडण्याचे आव्हान इंग्लंड संघासमोर असेल.”
हुसेन यांनी जॉनी बेअरस्टोला पहिल्या दोन कसोटीसाठी संघात न निवडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उभय संघांमध्ये चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळल्यानंतर पुढील दोन सामन्यांसाठी दोन्ही संघ अहमदादाबादला रवाना होतील. त्यानंतर टी२० व वनडे मालिकेने दौऱ्याची सांगता होईल.
महत्वाच्या बातम्या:
IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड?
या खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज






