नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा ) ने भारताचा स्टार कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनियावर कडक कारवाई केली आहे. नाडानं त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घातली. पुनियावर बंदी घालण्याचं कारण म्हणजे त्यानं केलेलं अँटी डोपिंग कोडचं उल्लंघन. या कारवाईमुळे त्याची खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्याचं मानलं जात आहे. आता या काळात तो कोचिंग देखील देऊ शकणार नाही.
बजरंग पुनियानं यावर्षी 10 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीदरम्यान डोपिंग चाचणीसाठी नकार दिला होता. ‘नाडा’नं सर्वप्रथम 23 एप्रिल रोजी त्याच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर जागतिक स्तरावरील कुस्ती संघटना UWW (युनायटेड वर्ल्ड रेसलिंग) ने देखील त्याच्यावर बंदी घातली होती. बजरंगनं या बंदीच्या विरोधात अपील केलं होतं.
बजरंगनं सुरुवातीपासूनच म्हटलं आहे की, भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याच्यासोबत पक्षपाती आणि अन्यायकारक वागणूक झाली. बजरंगनं सुरुवातीला निलंबनाचा निषेध केला होता. त्यानंतर 31 मे रोजी नाडाच्या डोपिंग विरोधी पॅनेलनं आरोपांची औपचारिक नोटीस जारी होईपर्यंत तात्पुरतं निलंबन मागे घेतलं. मात्र, पुन्हा 23 जून रोजी नाडानं त्याला या आरोपांची औपचारिक माहिती दिली. पुनियानं आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी आव्हान दाखल केलं, ज्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.
हरियाणातीस झज्जर येथे कुस्तीपटुंच्या कुटुंबात जन्मलेल्या बजरंगनं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकलं होतं. बजरंगचे वडील बलवान सिंग हे स्वतः कुस्तीपटू होते. बजरंगनं यावर्षी राजकारणामध्ये एंट्री केली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यानं किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
हेही वाचा –
पाकिस्तानात हिंसाचार, श्रीलंकेनं मालिका अर्धवट सोडली; इम्रान खान समर्थकांचा गोंधळ
27 कोटींना विकल्या गेलेल्या पंतला पूर्ण पैसे मिळणार नाही, टॅक्समध्ये द्यावी लागणार चक्क इतकी रक्कम!
या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न सुटणार! आयसीसीने आखली विशेष योजना