भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. भारताच्या विजयात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियाचे तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या तीन बळींसह नटराजन भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासह एका अनोख्या विक्रमात सामील झाला आहे. विशेष म्हणजे नटराजनला आपली पहिली टी२० कॅपदेखील बुमराहच्या हस्ते देण्यात आली होती.
भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी
उपकर्णधार केएल राहुलचे अर्धशतक व अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तुफानी ४३ धावांच्या जोरावर भारताने १६१ धावा धावफलकावर लावल्या होत्या. फलंदाजांनी उभारलेल्या १६१ धावांचे भारतीय गोलंदाजांनी सफाईदारपणे रक्षण केले. पदार्पण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन व कंकर्शन नियमांनुसार गोलंदाजीला आलेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव १५० धावांवर रोखला.
नटराजनचे अविस्मरणीय टी२० पदार्पण
वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या नटराजनने आज आपले आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. नटराजनने वनडे मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या दोन धावांवर माघारी पाठवले. पुढच्या षटकात ३४ धावांवर स्थिर झालेल्या सलामीवीर डार्सी शॉर्ट याला देखील हार्दिक पंड्याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. सामन्यातील १९ व्या षटकात मिचेल स्टार्कचा त्रिफळा उडवत त्याने आपले तीन बळी पूर्ण केले. नटराजनने आपल्या चार षटकात ३० धावा धावा दिल्या. त्याचा इकॉनोमी रेट अवघा ७ इतका किफायतशीर होता.
बुमराहने केली होती अशीच कामगिरी
सध्याच्या घडीला जगातील व भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहने देखील ऑस्ट्रेलियातच आपले टी२० पदार्पण केले होते. सन २०१५-२०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऍडलेड टी२० सामन्यातून बुमराहने टी२० पदार्पण केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. बुमराहने आपल्या पहिल्याच सामन्यात डेविड वॉर्नर, जेम्स फॉकनर व कॅमेरून बॉयस यांना बाद करण्यासाठी अवघी ३.३ षटके टाकली होती. यामध्ये त्याने फक्त २३ धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! यॉर्कर किंग नटराजनचे वनडे पाठोपाठ टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण
चिंता वाढली! क्वारंटाईन नियम तोडलेल्या पाकिस्तान संघाच्या सरावावर बंदी
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर