भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने अलीकडेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 29 वर्षांची सिंधू आता वधू बनण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. पीव्ही सिंधू हैदराबाद येथे राहणाऱ्या व्यंकट दत्ता साईसोबत लग्न करणार आहे. जो पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक आहे. सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी तिच्या लग्नाची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरले आहे. आम्ही दोन्ही कुटुंब आधीपासूनच ओळखतो. त्यामुळे जानेवारीपासून तिचे (सिंधूचे) वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी 22 डिसेंबरला लग्नसोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. पुढील सत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने ती लवकरच तिचे प्रशिक्षण सुरू करणार आहे. 20 डिसेंबरपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू होतील.”
पीव्ही सिंधू काही काळ खराब फॉर्मशी झुंजत होती. ऑलिम्पिकमध्येही ती काही विशेष दाखवू शकली नाही. मात्र आता सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिने आपली लय पुन्हा मिळवली असून आगामी काळात तिला अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ज्यामध्ये भारतीयांना तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतही दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.
पीव्ही सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते. तिने 2019 मध्ये सुवर्ण पदकांसह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय तिने ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहेत. या चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्याशिवाय मनू भाकर, सुशील कुमार आणि नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत.
हेही वाचा-
IND vs JAP, U19 Asia Cup: टीम इंडियाचा शानदार विजय, जपानला लोळवले; कर्णधाराची शतकी खेळी!
IPL 2025; आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन खतरनाक?
“माझा मुलगा तेंडुलकरपेक्षा मोठा बनेल…” माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य!