2024 टी20 विश्वचषकापूर्वी नेपाळ क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा 23 वर्षीय लेग स्पिनर संदीप लामिछाने याला या वर्षी जानेवारी महिन्यात बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु आता कोर्टानं संदीपला क्लीन चिट दिली आहे. यानंतर आता तो 2024 टी20 विश्वचषकात नेपाळकडून खेळू शकणार आहे. नेपाळ क्रिकेट बोर्डानं टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा आधीच केली असली तरी, संघांना 25 मे पर्यंत बदल करण्याची परवानगी आहे.
संदीप लामिछाने नेपाळमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला ऑक्टोबर 2022 मध्ये 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. संदीपवर त्या वर्षी ऑगस्टमध्ये काठमांडूतील हॉटेलमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. खटल्याची सुनावणी झाल्यानंतर डिसेंबरमध्ये न्यायाधीश शिशिर राज ढाकल यांनी त्याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. 12 जानेवारी रोजी पठाण हायकोर्टानं संदीपची 20 लाख रुपये दंड आणि काही अटी घालून जामिनावर सुटका केली होती.
हा खटला बराच काळ चालला. 10 जानेवारी 2024 रोजी लामिछानेला 3 लाख रुपयांच्या दंडासह 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय त्याला पीडितेला दोन लाख रुपये वेगळे द्यावे लागले. यानंतर संदीप लामिछानेच्या वतीनं ज्येष्ठ वकील राम नारायण बिदरी, रमण श्रेष्ठ, शंभू थापा, मुरारी सपकोटा आणि कृष्णा सपकोटा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर पठाण उच्च न्यायालयानं संदीपची निर्दोष मुक्तता केली.
संदीप लामिछानेनं शेवटचा सामना आतंरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ओमानविरुद्ध खेळला होता. त्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून आला, ज्यामध्ये ओमानचा विजय झाला होता. आता सर्व संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. संदीपला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे त्याला नेपाळच्या विश्वचषक संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र त्याच्या सुटकेनंतर नेपाळ क्रिकेट बोर्ड आपल्या संघात बदल करून संदीपला 15 खेळाडूंमध्ये स्थान देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला बसणार पावसाचा फटका! 18 मे रोजी बंगळुरूचं हवामान कसं असेल? जाणून घ्या