मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा इतिहास मोठा आहे. याच स्टेडियमवर 2011 मध्ये टीम इंडियानं विश्वचषक जिंकला होता. मात्र आता मुंबईमध्ये नवं स्टेडियम बांधण्याबद्दल विचार केला जात आहे. हे नवं स्टेडियम वानखेडे स्टेडियमच्या चौपट मोठं असेल. म्हणजेच, या स्टेडियमची आसन क्षमता वानखेडे स्टेडियमपेक्षा चार पटीनं जास्त असेल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
भारतीय संघानं नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. यानंतर मुंबईमध्ये विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये लाखोंच्या संख्येनं लोक जमा झाले होते. परेडच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या संघातील खेळाडूंना महाराष्ट्र विधानसभेत आमंत्रित करण्यात आलं होतं. तेथे त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला.
या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नव्या स्टेडियमबद्दल मत मांडलं. मुंबईला मॉडर्न स्टेडियमची आवश्यकता आहे. एक असं स्टेडियम जिथे जास्त प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असेल, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईला आता नव्या स्टेडियमची आवश्यकता आहे. वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक आहे, मात्र शहराला आता 1 लाख आसन क्षमता असलेल्या स्टेडियमची गरज आहे. आम्ही येणाऱ्या काळात असं स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्न करू.” फडणवीस असं बोलले असेल तरी अद्याप याबाबत कोणत्याही ठोस हालचाली झालेल्या नाही.
वानखेडे स्टेडियम 1974 मध्ये बनवण्यात आलं होतं. या स्टेडियममध्ये जवळपास 32,000 लोकं बसण्याची क्षमता आहे. हे तेच मैदान आहे, जेथे 2011 विश्वचषकाच्या फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं श्रीलंकेविरुद्ध षटकार लगावून भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता. सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम भारतातील सर्वात मोठं स्टेडियम असून, त्याची आसन क्षमता 1,30,000 एवढी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजची ‘विक्ट्री परेड’, या पध्दतीने झाले जंगी स्वागत
कचऱ्याची गाडी पाहून लगावले पाकिस्तान पाकिस्तानचे नारे! भारताच्या विजयी रॅलीतला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्यानं असं काही सांगितलं, जाणून तुम्ही पण व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ