---Advertisement---

दुसऱ्या कसोटीतील विजयासह न्यूझीलंडचा टीम इंडियाला व्हाईटवॉश

On: सोमवार, मार्च 2, 2020 8:17 AM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। न्यूझीलंडने भारताविरुद्ध हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी (2 मार्च) 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाचा हा कसोटी चॅम्पियनशीपमधील हा पहिलाच मालिका पराभव आहे.

भारताने या सामन्यात न्यूझीलंडला 132 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने दुसऱ्या डावाच्या 36 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामना खिशात घातला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेलने भक्कम सलामी भागीदारी रचत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता.

या दोघांनी 103 धावांची शतकी भागीदारी केली. पण ही भागीदारी तोडण्यात उमेश यादवला यश आले. त्याच्या गोलंदाजीवर लॅथम 52 धावांवर असताना झेलबाद झाला. यष्टीरक्षक रिषभ पंतने लॅथमचा सुरेख झेल घेतला. त्यानंतर लगेचच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. विलियम्सनला केवळ 5 धावा करता आल्या.

बुमराहने विलियम्सनची विकेट घेतल्यानंतर काहीवेळात 55 धावा करणाऱ्या टॉम ब्लंडेलला त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. ब्लंडेलने 113 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

मात्र त्यानंतर रॉस टेलर आणि हेन्री निकोल्सने विकेट न गमावता उर्वरित धावा सहज पूर्ण केल्या आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टेलरने आणि निकोल्सने प्रत्येकी नाबाद 5 धावा केल्या.

तत्पूर्वी आज भारताने दुसऱ्या डावाची 6 बाद 90 धावांपासून पुढे खेळण्यासाठी सुरुवात केली होती. पण काल दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद असलेले हनुमा विहारी(9) आणि रिषभ पंत(4) यांनी आज सुरुवातीलाच विकेट गमावल्या. विहारी टीम साऊथीच्या गोलंदाजीवर तर पंत ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या दोघांचाही झेल यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगने घेतले.

त्यांच्यापाठोपाठ काही वेळातच मोहम्मद शमीही(5) साऊथीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर जसप्रीत बुमराह(4) धावबाद झाला. भारताकडून रविंद्र जडेजाने लढत देण्याचा प्रयत्न केला, पण एका बाजूने विकेट गेल्याने त्यालाही खास काही करता आले नाही. तो 1 चौकार आणि 1 षटकार मारुन 16 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी कालच भारताने दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ(14), मयंक अगरवाल(3), चेतेश्वर पुजारा(24), विराट कोहली(14), अजिंक्य रहाणे (9) आणि उमेश यादव (1) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात सर्वबाद 124 धावाच करता आल्या आणि भारताने पहिल्या डावात घेतलेल्या 7 धावांच्या आघाडीमुळे न्यूझीलंडला 132 धावांचे आव्हान दिले होते.

भारताच्या या दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर टीम साऊथीने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कॉलिन डी ग्रँडहोम आणि नील वॅगनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

त्याआधी भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला होता. तर न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला होता.

संक्षिप्त धावफलक – 

भारत पहिला डाव – सर्वबाद 242 धावा (भारत – हनुमा विहारी 55 धावा; न्यूझीलंड – काईल जेमिसन – 5 विकेट्स)

न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद 235 धावा (न्यूझीलंड – टॉम लॅथम 52 धावा; भारत – मोहम्मद शमी – 4 विकेट्स)

भारत दुसरा डाव – सर्वबाद 124 धावा (भारत – चेतेश्वर पुजारा 24 धावा; न्यूझीलंड – ट्रेंट बोल्ट 4 विकेट्स)

न्यूझीलंड दुसरा डाव – 3 बाद 132 धावा (न्यूझीलंड – टॉम ब्लंडेल 55 धावा; भारत – जसप्रीत बुमराह – 2 विकेट्स)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---