पहिल्या कसोटीत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा दणदणीत विजय

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 66  व्या षटकापासून 4 बाद 144 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी फलंदाजी करत होते. पण आजचा खेळ सुरु झाल्यानंतर भारतीय फलंदाजी टीम साऊथी, ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसली.

आज सुरुवातीलाच 68 व्या षटकात बोल्टच्या गोलंदाजीवर प्रथम रहाणे 75 चेंडूत 29 धावा करुन झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात साऊथीने विहारीला 15 धावांवर असताना त्रिफळाचीत केले. त्यानंतर काहीवेळातच लगेचच आर अश्विनला साऊथीने पायचीत केले. त्यामुळे भारताची आवस्था 7 बाद 162 धावा अशी झाली होती.

यावेळी रिषभ पंत आणि इशांत शर्माने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पंरतू इशांतला 21 चेंडूत 12 धावांवर असताना कॉलिन डी ग्रँडहोमने पायतीच केले. त्याच्या पुढच्याच षटकात रिषभ पंत 25 धावांवर तर जसप्रीत बुमराह शून्य धावेवर साऊथीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाले.

तसेच काल तिसऱ्या दिवशी भारताने पृथ्वी शॉ(14), मयंक अगरवाल(58), विराट कोहली(19) आणि चेतेश्वर पुजारा(11) यांच्या विकेट्स आधीच गमावल्या होत्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 191 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून या डावात टीम साऊथीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 4 विकेट्स घेतल्या आणि कॉलिन डी ग्रँडहोमने 1 विकेट घेतली.

तसेच न्यूझीलंडने पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली असल्याने त्यांना विजयासाठी दुसऱ्या डावात केवळ 9 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने 7 आणि टॉम ब्लंडेलने 2 धावा काढत दुसऱ्याच षटकात सहज पार केले.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 165 धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून रहाणेने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली होती. तर न्यूझीलंडकडून काईल जेमिसन आणि साऊथीने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्या आणि 183 धावांची भक्कम आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक – 

भारत पहिला डाव – सर्वबाद 165 धावा (भारत – अजिंक्य रहाणे 46 धावा; न्यूझीलंड – काईल जेमिसन – 4 विकेट्स, टीम साऊथी 4 विकेट्स)

न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद 348 धावा (न्यूझीलंड – केन विलियम्सन 89 धावा; भारत – इशांत शर्मा – 5 विकेट्स)

भारत दुसरा डाव – सर्वबाद 191 धावा (भारत – मयंक अगरवाल 58 धावा; न्यूझीलंड – टीम साऊथी 5 विकेट्स)

न्यूझीलंड दुसरा डाव – बिनबाद 9 धावा (न्यूझीलंड – टॉम लॅथम 7* धावा)

You might also like