भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल 25 वर्षं प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सक्रिय राहिल्यानंतर अखेर त्याने क्रिकेटला अलविदा केला.
अमित मिश्राने आपल्या निवृत्तीचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, वारंवार होणाऱ्या दुखापती आणि तरुण पिढीला मोठ्या मंचावर संधी मिळावी, या दोन गोष्टींमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. प्रेस रिलीजद्वारे त्याने अधिकृत घोषणा केली.
अमित मिश्राने भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय सामने आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर शेवटचा सामना त्याने 2017 मध्ये खेळला. कसोटीत 76, एकदिवसीयमध्ये 64 आणि टी20 आयमध्ये 16 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये त्याने तब्बल 174 विकेट्स घेतल्या असून, त्याचे या स्पर्धेत मोठे नाव आहे.
Veteran leg-spinner #AmitMishra announces his retirement from all forms of cricket. He represented India in 22 Tests, 36 ODIs and ten T20Is and holds the record for the only bowler to take three hat-tricks in the IPL. pic.twitter.com/Sf1ueQcdbk
— All India Radio News (@airnewsalerts) September 4, 2025
निवृत्तीची घोषणा करताना मिश्रा म्हणाला, “क्रिकेटमधील 25 वर्षांचा हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट संघ, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ आणि कुटुंबीयांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. चाहत्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास खास झाला.”
पुढील काळात तो क्रिकेटशी जोडलेलाच राहणार असून, कोचिंग, समालोचन किंवा तरुण खेळाडूंना मार्गदर्शन या माध्यमातून खेळासाठी योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.






