भारताचा वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर 25 ऑक्टोबर रोजी सिडनीत कॅच घेताना गंभीर जखमी झाला होता. त्या क्षणी मैदानावर फिजिओ धावून आले, मात्र प्राथमिक उपचारांनंतरही श्रेयसला आराम मिळाला नाही. त्यानंतर त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं, पण तिथेही त्याची प्रकृती ढासळली आणि अखेर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेसिंग रूममध्ये श्रेयस अय्यर बेशुद्ध पडला होता, आणि त्याचे महत्त्वाचे शारीरिक पॅरामिटर्स धोकादायकरीत्या खाली आले होते. तत्काळ बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. स्कॅन अहवालात धक्कादायक गोष्ट उघड झाली, अय्यरच्या स्प्लीनला (प्लीहा) गंभीर दुखापत झाली होती.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितलं की, “श्रेयस अय्यरच्या डाव्या खालच्या बरगड्यांवर दुखापत झाली असून त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. स्कॅनमध्ये त्याच्या स्प्लीनमध्ये कट असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे.”
पीटीआयशी बोललेल्या एका सूत्रानुसार,”श्रेयस काही दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. तपासणीनंतर इंटरनल ब्लीडिंग आढळलं आणि त्याला तातडीने अॅडमिट करावं लागलं.”
याचदरम्यान, दैनिक जागरणच्या अहवालानुसार, बीसीसीआय मेडिकल टीमचे प्रमुख आणि आयसीसी मेडिकल पॅनलचे सदस्य डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी या प्रकरणात बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफचे कौतुक केलं आहे. त्यांनी 26 ऑक्टोबरच्या संध्याकाळी बीसीसीआयला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिलं -“स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमने योग्य वेळी अचूक निर्णय घेतला आणि तात्काळ पावलं उचलली. त्यांच्या तत्परतेमुळे एक जीव वाचवता आला.”






