येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करत आहे. तर न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्हीही संघ विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने या मोठ्या सामन्याबद्दल भाष्य केले आहे.
न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघांतील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे.
विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी, रॉस टेलरने म्हटले की, “न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे, आमच्या निवडकर्त्यांना सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी पुरेसे पर्याय असतील.”
तसेच रॉस टेलर पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंसाठी ही एक परीक्षा आहे. कारण त्यांना दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच आम्ही अंतिम सामना पाहता काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. संघातील तीन युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवला असून निवड समितीनेही बॅकअप म्हणून चांगल्या खेळाडूंची निवड केली. जेणेकरुन आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुठल्याही प्रकारच्या संघासह मैदानावर जाऊ शकू.”
मॅट हेन्री, विल यंग आणि एजाज पटेल या खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले होते. तिन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ही जोरदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंड संघाला अवघ्या १२२ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाने दिलेल्या ३८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्णधार टॉम लेथमने २३ धावा केल्या तर रॉस टेलर शून्य धावांवर नाबाद होता. न्यूझीलंड संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड संघाने तब्बल २२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रेकॉर्डब्रेकर जिमी! वॅग्नरला बाद करताच मोडीत काढला मॅकग्राचा ‘तो’ विक्रम
केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल