न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाहुण्या वेस्ट इंडीज संघावर वेलिंग्टन कसोटीत एक डाव आणि १२ धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर २-० ने कब्जा केला. या विजयासह न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे समान गुण झाले आहेत. मात्र, दशांश गुणांच्या फरकाने ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी अबाधित राहिला.
न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी झेप
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटीमध्ये न्यूझीलंडने सलग दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला डावाने पराभूत करण्याची किमया केली. या विजयासह न्यूझीलंडने घरेलू जमिनीवर सलग १५ कसोटी सामने अपराजित राहण्याची कामगिरी करून दाखवली. सोबतच, न्यूझीलंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानी आला. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांचे प्रत्येकी ११६ गुण झाले आहेत. मात्र, दशांश गुणांच्या फरकाने न्यूझीलंड मागे पडला.
अशी आहे इतर संघांची क्रमवारी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पाठोपाठ भारतीय संघ ११४ गुणांसह चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानी उभा आहे. त्यानंतर, इंग्लंड आणि श्रीलंकेचा क्रमांक लागतो. नऊ संघाच्या या स्पर्धेत अंतिम चारमध्ये अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्टइंडीज आणि बांगलादेश हे संघ समाविष्ट आहेत.
भारतासाठी झाली वाट खडतर
भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर मोठा अवघड रस्ता पार करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आठ कसोटींपैकी चार किंवा पाच कसोटीत भारताला विजय मिळवावा लागेल. सोबतच, तीन कसोटी या अनिर्णित राखाव्या लागतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जुलै २०२१ मध्ये क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.
संबधित बातम्या:
– दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला हा क्रमांक
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना टाय