भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच ॲडलेड येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेटने पराभव केला. पहिल्या डावात आघाडीवर असतानादेखील भारतीय संघाचा झालेला पराभव हा संपूर्ण क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे. सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 36 धावाच करु शकला. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने केवळ दोन गडी गमावत धावांचा पाठलाग पूर्ण केला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर जो बर्न्सने नाबाद 51 धावांची खेळी केली. सामन्याच्या सुरुवातीला खराब फॉर्ममध्ये असल्याने बर्न्सच्या संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह होते, मात्र ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत संघात त्याला स्थान दिले. बर्न्सने देखील आपल्या खेळीने संघाचा हा विश्वास सार्थ ठरवला.
सामन्यानंतर बर्न्सला भारतीय खेळाडूंबद्दल प्रश्न विचारले असता, त्याने भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री असल्याचे स्पष्ट केले आहे. बर्न्सला विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारले असता तो म्हणाला,’ विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघावर दबाव वाढलेला आहे, पण भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात नक्की पुनरागमन करेल. भारतीय संघात उत्तम खेळाडू आहेत व ते कुठल्या क्षणी पुनरागमन करण्यात सक्षम आहेत.’
विराट पालकत्व रजा घेतल्याने भारतात परतणार आहे. तर शमी पहिल्या कसोटी दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे.
शॉने धावा करु नये – बर्न्स
बर्न्सला खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला काही सल्ला देणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला,’ मी आता सध्या त्याच्याविरुद्ध खेळत असल्यामुळे त्याला कुठलाही सल्ला देणार नाही. निश्चितच भारताकडून खेळत असल्यामुळे पृथ्वीमध्ये विशेष क्षमता असणार. मी त्याला पूर्णत: ओळखत नाही व मला त्याच्या खेळाबद्दल पूर्ण कल्पना देखील नाही. मला वाटते, त्याने आता आमच्या विरुद्ध बिलकुल धावा बनवूच नये. पण भविष्यात बनवल्या तर काही हरकत नाही. मी त्याला मालिकेनंतर सल्ला देऊ शकतो, पण आता नाही.’
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना 26 तारखेपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे .पहिल्या सामन्यात बर्न्सने उत्तम कामगिरी केलेली असून ऑस्ट्रेलियन संघाला मेलबर्न येथेही त्याच्याकडून अशात कामगिरीची आशा असेल. दुसरीकडे पृथ्वी शॉला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळते की नाही, हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“युवा खेळाडू फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष देतात”, माजी भारतीय दिग्गजाने व्यक्त केली चिंता
तेव्हा वाडेकर यांच्या आणि आता कोहलीच्या टीम इंडियाची निचांकी धावसंख्या, पाहा दोन सामन्यांतील समानता
“त्या दौऱ्यामुळे माझ्यात बदल घडला”, सचिनने दिला जुन्या आठवणींना उजाळा