भारतीय क्रिकेट संघात सध्या कर्णधारपदावरुन मोठा वाद उफळला आहे. टी२० विश्वचषकानंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुनही पायउतार करण्यात आले आहे. येत्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (India Tour Of South Africa) बीसीसीआयकडून अचानक या निर्णयाची घोषणा करण्यात आली. विराटकडून मर्यादित षटकांच्या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून ती रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हाती सोपवण्यात आली आहेत.
यानंतर बीसीसीआय (BCCI) मध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विराट यांच्या एका मुद्द्यावर विरोधाभासी प्रतिक्रिया आल्या. यावर आता गागुंलींनी मौन सोडले आहे (Sourav Ganguly Breaks Silence).
त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी विराटच्या वनडे नेतृत्त्वपदाविषयी बोलताना गांगुलींनी म्हटले होते की, ‘आम्ही विराटला टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडू नये म्हणून विनंती केली होती. तरीही त्याने टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये २ वेगवेगळे कर्णधार असू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला विराटला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरुन काढावे लागले आहे.’
यानंतर नुकत्याच एका पत्रकार परिषदेत विराटने बीसीसीआयच्या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी गांगुलींच्या वरील मुद्द्यावर त्याने विरोधाभासी प्रतिक्रिया दिली.
‘मी जेव्हा बीसीसीआयला टी२० कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितले होते, तेव्हा त्याचा खूप चांगल्याप्रकारे स्वीकार करण्यात आला होता. त्यात कुठल्याच प्रकारचा संकोच नव्हता. हे खूप प्रगतीशील पाऊल होते. त्यावेळी मी सांगितले होते, की मी वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. माझ्याकडून संवाद खूप स्पष्ट होता. तसेच मला कोणीही टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले नव्हते. पण, त्याचवेळी मी हे देखील स्पष्ट केले होते की, जर अधिकाऱ्यांना आणि निवडकर्त्यांना वाटत असेल की मी बाकी प्रकारात नेतृत्त्व करू नये, तर माझी काही तक्रार नव्हती,’ असे विराट म्हणाला.
अशाप्रकारे विराट आणि गांगुली यांच्या एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याने हे प्रकरण अजून जास्तच तापले आहे. यानंतर गांगुलींनी विराटच्या वक्तव्यावर कसलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विराटच्या विवादाविषयी बोलताना गांगुली म्हणाले की, ‘सध्या कोणतीही टिप्पणी नाही. बीसीसीआय या प्रकरणात जातीने लक्ष घालेल.’
महत्त्वाच्या बातम्या-
थोडं नशीब थोडी मेहनत! ४ वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथ झाला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, ‘हे’ आहे कारण
जरा इकडे पाहा! टी२० मध्ये सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
‘दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय’, कर्णधार विराट कोहलीचा निर्धार