भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या इंग्लंडमध्ये वनडे कप स्पर्धा खेळत आहे. नॉर्दम्पटनशायर संघासाठी खेळत असताना त्याने रविवारी (13 ऑगस्ट) पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. स्पर्धेत आपला चौथा सामना खेळत असलेल्या पृथ्वी याने डरहॅमविरुद्ध 68 चेंडूंवर तुफानी शतक झळकावले. त्याने या आधीच्या सामन्यात त्याने सॉमरसेटविरूद्ध 244 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीनंतर नॉर्दम्पटनशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनी त्याचे कौतुक केले.
डरहॅमविरूद्धच्या सामन्यात 199 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी याने आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पडत केवळ 68 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 76 चेंडूत 125 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे नॉर्दम्पटनशायर संघ सहा गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
या सामन्यानंतर बोलताना संघाचे प्रशिक्षक सॅडलर म्हणाले,
“पृथ्वी शॉ एक सुपरस्टार आहे. त्याचे कौशल्य त्याच्या बॅटमधून दिसते. चेंडू मारण्याच्या बाबतीत तो सर्वोत्कृष्ट आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये एक नामांकित खेळाडू म्हणून ओळखला जातोय. तो नम्र असून, सर्वांना आदर देतो.”
यावर्षी आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर पृथ्वी याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे दार काहीसे बंद झाले होते. त्याने भारतीय संघासाठी आपला अखेरचा सामना 2021 मध्ये खेळला आहे. त्यानंतर त्याने नॉर्दम्पटनशायर संघाशी करार केला. संघासाठी आपला तिसरा सामना खेळताना त्याने 244 धावांची अद्वितीय खेळी केलेली.
(Northamptonshire Coach John Sadler Praised Prithvi Shaw)
कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन
आशिया कप 2023 पूर्वीच पाकिस्तान बनू शकतो नंबर 1 वनडे संघ, जाणून घ्या कसा?