टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. सध्या जोकोविच विरुद्ध ऑस्ट्रेलियन सरकार हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. आता असे समोर येत आहे की, ऑस्ट्रेलियन सरकारकडून दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मेलबर्नमधून शनिवारी (१५ जानेवारी) ताब्यात घेण्यात आले आहे.
नक्की काय आहे प्रकरण
ऑस्ट्रेलियामध्ये १७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ ही ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी जोकोविच ६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. मात्र, त्याच्याकडे कोरोना लसीबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. तसेच लसीकरणाच्या नियमातून सुट मिळाल्याचीही आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याचा व्हिसा पहिल्यांदा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्याला विमानतळावरून पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आले होते.
पण त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्याला मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत त्याला दिलासा दिला होता. त्यामुळे जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली होती.
अधिक वाचा – टेनिसपटू नोवाक जोकोविचवर ओढावली संक्रात, ऑस्ट्रेलियन सरकारकडून व्हिसा दुसऱ्यांदा रद्द
मात्र, शुक्रवारी (१४ जानेवारी) ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ऍलेक्स हॉक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत जोकोविचचा व्हिसा पुन्हा एकदा रद्द केला आहे. आरोग्य आणि सुव्यवस्था ही कारणे देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्याच्या व्हिसावर सुनावणी सुरू असल्याने पुन्हा एकदा जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने ताब्यात घेतले आहे. आता यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जोकोविचने आत्तापर्यंत २० ग्रँडस्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत जोकोविच राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. जोकोविचने जिंकलेल्या २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये ९ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या विजेतेपदांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?