भारतीय महिला क्रिकेट संघ (indian women’s cricket team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी उभय संघात बुधवारी (०९ फेब्रुवारी) एकमात्र टी-२० सामना (nz vs ind women’s t20i) खेळला गेला. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनापुढे भारतीय संघाने पराभव पत्करला. न्यूझीलंडने १८ धावांनी विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताची अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना (smriti mandhana) या टी-२० सामन्यात अनुपस्थित होती. तिची कमतरता नक्कीच संघाला भासली. स्मृती मंधानाच्या जागी यस्तिका भाटियाने (yastika bhatiya) भारताच्या डावाची सरुवात केली. यस्तिका आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. भारताला पहिला झटका सातव्या षटकात मिळाला. यस्तिका आणि शेफाली यांनी एका षटकात एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. यस्तिकाने २६ तर शेफालीने १३ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरही खराब फॉर्ममध्ये दिसली, तिने १३ चेंडूत १२ धावा करून विकेट गमावली.
भारतासाठी सर्वाधिक धावा अनुभवी एस मेघनाने केल्या. मेघनाने ३० चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये ३७ धावा केल्या. मेघना आणि ऋचा घोष (१२) यांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. मेघनाची विकेट पडल्यानंतर भारतीय संघाला एकप्रकारे गळती लागल्याचे दिसले. परिणामी संघ २० षटकात अवघ्या १३७ धावा बनवू शकला आणि १८ धावांनी पराभव पत्करला.
तत्पूर्वी गोलंदाजीमध्ये भारताची अष्टपैलू दिप्ती शर्मा आणि पुजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला पाच विकेट्ससह १५५ धावांवर रोखले. वस्त्राकरने किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार षटकात १६ धावा दिल्या, तर शर्माने २६ धावा खर्च केल्या. फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड संघाला महागात पडली. गायकवाडने चार षटकांमध्ये ३९ धावा खर्च करून एक विकेट घेतली.
https://twitter.com/sparknzsport/status/1491247109886349313?s=20&t=F7gr_mJ8r6CopehkyuelKg
न्यूझीलंडसाठी कर्णधार सोफी डिवाइनने २३ चेंडूत ३१ धावा केल्या, तर सूजी बेट्सने ३४ चेंडूत ३६ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी या दोघींनी ६० धावांची भागीदारी रचली.
भारतासाठी मेघना आणि सिमरन बहादुर यांनी पदार्पण केले. सिमरनने तिच्या पदार्पण सामन्याच्या दुसऱ्या षटकात डिवाइनचा एक महत्वाचा झेल सोडला. डिवाइनने त्यावेळी फक्त १ धाव केली होती. या एकमात्र टी-२० सामन्यानंतर उभय संघातील एकदिवसीय मालिका शनिवारी (१२ फेब्रुवारी) सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारचे अर्धशतक ठरले विक्रमी! ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटर
दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट
फलंदाजीत फेल, तरीही कोहलीच्या नावावर ‘विराट’ विक्रमाची नोंद; गांगुलीला टाकलंय मागे