पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला ३ जानेवारीपासून ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सनच्या शतकाच्या जोरावर ३ बाद २८६ धावांची मजल मारली. मात्र अजूनही पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ते ११ धावांनी पिछाडीवर आहेत. दिवसाखेर विलियम्सन ११२ धावांवर तर हेन्री निकोल्स ८९ धावांवर नाबाद आहेत.
पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला पहिल्या डावात २९७ धावांवर गुंडाळले. त्याच्या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी नोंदवली. मात्र त्यांनतर ५२ धावसंख्येवर हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. शाहीन आफ्रिदीने टॉम लॅथमला ३३ धावांवर झेलबाद केले, तर टॉम ब्लंडेलला फहीम अश्रफने 19 धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विलियम्सनने अनुभवी रॉस टेलरला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टेलरही अवघ्या १२ धावा काढून मोहम्मद अब्बासची शिकार ठरला.
न्यूझीलंड ३ बाद ७२ अशा संकटात असताना पाकिस्तानला सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याची संधी होती. मात्र विलियम्सनने पाचव्या क्रमांकावरील हेन्री निकोल्सला साथीला घेत पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. विलियम्सनने १७५ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने ११२ धावांची नाबाद खेळी साकारली. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २४वे शतक लगावले. त्याला डावखुऱ्या हेन्री निकोल्सने तितकीच तोलामोलाची साथ दिली. निकोल्सने १८६ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ८९ धावांची नाबाद खेळी उभारली. या दोघांच्या २१५ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाखेर मजबूत स्थितीत आहे.
पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास आणि फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानला या सामन्यात पुनरागमन करायचे असल्यास तिसऱ्या दिवशी गोलंदाजांकडून दमदार कामगिरी अपेक्षित असेल.
महत्वाच्या बातम्या:
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांचा दबदबा; शतक सोडा द्विशतकेही ठोकलीत याच मैदानावर
“एकतर तुम्ही संघनिवडीसाठी उपलब्ध राहू नका किंवा बायो-बबलच्या नियमांचे पालन करा”