दक्षिण अफ्रिका संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील त्यांचे दोन्ही कसोटी सामने खेळले आहेत (NZ vs SA Test Series). मालिकेतील दुसरा सामना २५ फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला आणि दक्षिण अफ्रिका संघ यामध्ये विजयी ठरला. परंतु सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा युवा खेळाडू विल यंग (Will Young) याने एक खूपच अप्रतिम झेल घेतला, ज्यासाठी त्याचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले. त्याचा हा झेल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिका संघ जेव्हा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, तेव्हाच ७९ व्या षटकात हा झेल घेतला गेला. विल यंगने हा अप्रतिम झेल घेऊन मार्को जेन्सनला तंबूत माघारी पाठवले. त्यावेळी दक्षिण अफ्रिका संघाची धावसंख्या २१९ होती आणि जेन्सनच्या रूपात त्यांनी ७ वी विकेट गमावली. मार्को जेन्सन सावधगिरीने खेळत होता, पण एक शॉर्ट चेंडू मिळताच त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद झाला.
जेन्सनने हा चेंडू मिडविकेट आणि लॉन्ग ऑनच्या मध्ये मारला होता आणि विल यंगने अनपेक्षितपणे हा झेल घेतला. चेंडू वेगात विल यंगच्या डाव्या बाजूने चालला होता आणि तो मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. यंग वेगात धावला आणि उलट्या दिशेने धावताना एका हातात हा झेल पकडला. डाइव मारल्यानंतर तो सीमारेषेपलिकडे जाऊ शकत होता, पण डाव्या हाताच्या खांद्याला पुढे करून त्याने खालच्या दिशेने शरीर लोटले. ही विकेट न्यूझीलंड संघासाठी खूप महत्वाची असल्यामुळे चाहते आणि समालोच यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1498153891594403840?s=20&t=mHtAo1svJZHONdAaMlOy5g
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने ३६४ तर न्यूझीलंडने २९३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिका संघाने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करत ३५४ धावा केल्या आणि विजयासाठी न्यूझीलंडला ४२६ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघ २२७ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी दक्षिण अफ्रिकेने १९८ धावांनी मोठा विजय मिळवला. याआधी उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने एक डाव आणि २७६ धावांनी मोठा विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या –
विराटला १०० व्या कसोटीसाठी काय भेट देणार? बुमराहने दिले ‘हे’ उत्तर