६ ऑगस्ट १९९७, श्रीलंका ९५२-६ घोषित
१९९७ मध्ये आजच्याच दिवशी, श्रीलंकेने कोलंबोत भारताविरुद्ध ९५२ धावांची मजल मारत कसोटी इतिहासातील सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. इंग्लंडने १९३८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे केलेला ९०३ धावांचा विक्रम अर्जुन रणतुंगाच्या संघाने मागे सोडला.
१९९७ मध्ये, भारताने केलेला श्रीलंका दौरा त्यातील निरस कसोटी मालिकेसाठी ओळखला जातो. दोन्ही सामने विचित्र पद्धतीने अनिर्णित राहिले होते. पहिला पहिला सामना असा होता, जो यजमानांनी रणधुमाळी केल्यासाठी लक्षात ठेवला जातो.
आर प्रेमादासा स्टेडियमवरील फलंदाजांचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारताने नवज्योतसिंग सिद्धू, कर्णधार सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या शतकी खेळ्यांच्या जोरावर ८ बाद ५३७ या धावसंख्येवर डाव घोषित केला.
दुसर्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात, निलेश कुलकर्णीने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर मार्वान अटापट्टूचा बळी घेत संस्मरणीय सुरुवात केली. दिवसाअखेर, श्रीलंकेची धावसंख्या ३९-१ अशी होती. त्यानंतर, सनथ जयसूर्या व रोशन महानामा यांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरशः रडवले.
सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा यांनी अनुक्रमे ३४० आणि २२५ धावा झळकावताना भारतीय गोलंदाजांचे हालहाल केले. त्यावर कळस म्हणून, अरविंदा डी सिल्वाने १२६ धावा जोडल्या.
जयसूर्या आणि महानामाची भागीदारी पूर्ण दोन दिवस टिकली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. ७५३ मिनिट एकत्रित फलंदाजी करत त्यांनी ५७६ धावांची भागीदारी रचली. त्यावेळी ते, कसोटी इतिहासातील व प्रथमश्रेणीच्या सर्वोच्च भागीदारीपासून अवघी एक धाव मागे राहिले. १९४६-४७ मध्ये भारताच्या विजय हजारे आणि गुल मोहम्मद यांनी ५७७ धावांची भागीदारी रचली होती.
जयसूर्या, महानामा व डिसिल्वाच्या खेळ्यांनंतर, कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि २० वर्षीय पदार्पण करणारा महेला जयवर्धनेने पाचव्या दिवशी अर्धशतके करत भारतीय क्षेत्ररक्षकांच्या जखमेवर मीठ चोळले.
पाचव्या दिवशी, १३ षटकांचा खेळ शिल्लक असताना निकाल लागणार नाही हे पाहून दोन्ही कर्णधारांच्या संमतीने खेळ थांबविण्यात आला.
जयसूर्याला त्रिशतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.