ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केली गेलेली १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण होती. विश्वचषक प्रथमच पांढऱ्या चेंडूने व रंगीबेरंगी कपड्यात खेळला जाणार होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील पहिल्यांदा विश्वचषक खेळत होता तर, क्षेत्ररक्षणाबाबत नियमावली तयार केली गेलेली. कोणालाही माहीत नसलेला डकवर्थ लुईस नियम प्रथमच वापरला जाणार होता. या विश्वचषकापासून सर्वार्थाने आधुनिक क्रिकेटला सुरुवात होत होती आणि या ऐतिहासिक विश्वचषकाचा विजेता होता पाकिस्तान. पाकिस्तानच्या विश्वविजयाला आज (२५ मार्च) ३० वर्ष झाली.
पाकिस्तानची खराब सुरुवात
या विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तानसाठी अत्यंत खराब झाली. पहिल्या पाचपैकी तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारत, वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्ध देखील पाकिस्तान संघ ७४ धावांवर सर्वबाद झाला होता. मात्र, हा सामना पावसामुळे अर्धवट राहिल्याने पाकिस्तानला एक महत्त्वपूर्ण गुण मिळाला. अखेरच्या तीन सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया, श्रीलंका व न्यूझीलंडला पराभूत करत पाकिस्तानने उपांत्य फेरीत जागा पटकावली.
इंझमामने गाजवली उपांत्य फेरी
उपांत्य फेरीत पाकिस्तानने साखळी फेरीत आठ पैकी सात सामने जिंकणार्या न्यूझीलंडला पराभूत केले. इंझमामने केवळ ३७ चेंडूत ६० धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला २६३ धावांचे मोठे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने इम्रान खान, आमिर सोहेल, रमीज राजा आणि सलीम मलिक यांचे महत्वपूर्ण बळी केवळ १४० धावांत गमावले.
अशा परिस्थितीत युवा फलंदाज इंझमामने क्रीजवर पाऊल ठेवले आणि येताच त्याने आश्चर्यकारक फटकेबाजी केली. इंझमामने अवघ्या ३७ चेंडूंत ६० धावा करून ७ चौकार आणि एका षटकारासह संपूर्ण सामना पलटवला. त्याने जावेद मियांदादसह १० षटकात ८७ धावा जोडल्या. मात्र, जेव्हा पाकिस्तानला ८ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती तेव्हा इंझमाम धावबाद झाला. मात्र, शेवटी मोईन खानने ख्रिस हॅरिसच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार लगावत पाकिस्तानला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
अक्रम ठरला फायनलचा हिरो
पाकिस्तानने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा सामना केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इम्रान खान यांच्या ७२ धावांच्या जोरावर सहा गडी गमावून २४९ धावा केल्या. इम्रानसह स्विंग गोलंदाज वसीम अक्रमने शेवटच्या क्षणी १८ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जावेद मियांदादने ५८ तर, उपांत्य फेरीचा हिरो इंझमामने ४२ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे दोन गडी केवळ २१ धावांवर बाद झाले. वसीम अक्रमने सलामीवीर इयान बॉथमला शून्यावर तर, अकीब जावेदने ऍलेक स्टीवर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर नील फेअरब्रोदर (६२ धावा) आणि ऍलन लॅम्ब (३१ धावा) यांनी डाव सावरला. परंतु, अक्रमने सलग चेंडूंवर लॅम्ब आणि ख्रिस लुईस यांना चालते करत पाकिस्तानच्या विजयाची पुष्टी केली. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्रमला सामनावीर म्हणून निवडले. त्याच्या व्यतिरिक्त मुश्ताक अहमदने तीन, अकीब जावेदने २ तर, इम्रान खान यांनी एक गडी बाद केला. तसेच हा इम्रान खान यांचा शेवटचा वनडे सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फक्त २ कॅच आणि धोनी होणार टी२० क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील
काय सांगता! आयपीएल २०२२नंतर धोनी घेणार निवृत्ती? चेन्नईच्या मालकांनीच दिलंय उत्तर
‘जेव्हा मी पाहिलं +९१वरून फोन येतोय, तेव्हाच समजलं…’, आयपीएल लिलावाबद्दल जोफ्रा आर्चरा मोठा खुलासा