‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचं नाव जरी घेतलं अनेक क्रिकेटप्रेमींना त्याचे लांबलचक षटकार, आक्रमक फलंदाजी, चपळ यष्टीरक्षण, 2007 टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक, अशा अनेक गोष्टी समोर येतात. धोनीने त्याच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तसेच आयसीसीएच्या तीन वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धांच्या ट्रॉफी जिंकणाराही तो एकमेव कर्णधार आहे.
एखाद्या क्रिकेटपटूची कारकिर्द कशी असावी, असे विचारले, तर अनेक जण धोनीचं उदाहरणही देतील. कारण एखाद्या क्रिकेटपटूला आपल्या कारकिर्दीत जे जे मिळवावं वाटतं, जवळपास ते सर्वच धोनीने मिळवलं आहे. पण या सर्वांची सुरुवात झाली कुठून? धोनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आला कधी, तर तो दिवस म्हणजे 5 एप्रिल 2005 रोजी. ज्यादिवशी त्याने ताबडतोड फलंदाजी करत आपले पहिले वहिले शतक साजरे केले होते. त्या दिवसानंतर खऱ्याअर्थाने एमएस धोनी पर्वाला सुरुवात झाली.
गांगुलीचा निर्णय ठरला धोनीसाठी फायदेशीर
धोनीने डिसेंबर 2004 साली बांगलादेश दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या मालिकेत मात्र तो छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. पण त्याच्यावर विश्वास ठेवत निवड समीतीने त्याला मायदेशात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात कायम केले होते. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार होता. हा धोनीचा कारकिर्दीतील पाचवा वनडे सामना होता.
या सामन्याआधी धोनीने तळातल्या फळीत फलंदाजी केली होती. पण त्या सामन्यासाठी त्यावेळचा भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्याऐवजी एमएस धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. गांगुलीचा हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरला होता. कारण त्यादिवशी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना धोनीने वादळी खेळी केली होती.
धोनीचं पहिलं-वहिलं शतक
विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिला धक्का चौथ्याच षटकात बसला होता. सलामीवीर सचिन तेंडुलकर 2 धावांवरच माघारी परतला होता. पण त्यानंतर मैदानात उतरला तो 24 वर्षीय युवा क्रिकेटपटू एमएस धोनी.
त्याने सुरुवातीला आक्रमक खेळणाऱ्या विरेंद्र सेहवागला साथ द्यायला सुरुवात केली. सेहवागसह त्याने 96 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताने आपल्या डावाचा पाया भक्कम रचला होता. मात्र, त्यानंतर सेहवाग 40 चेंडूत 74 धावांवर आणि पाठोपाठ गांगुली केवळ 9 धावा करुन बाद झाला. पण पुन्हा राहुल द्रविडने धोनीबरोबर खेळताना भारताचा डाव सावरला.
त्यावेळी खेळताना धोनीचे आक्रमक रुप सर्वांनाच पाहायला मिळाले. त्याने त्यावेळ 88 चेंडूत त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले-वहिले शतक पूर्ण केले होते. त्याचे हे शतक होत असताना दुसऱ्या बाजूला राहुल द्रविड संयमी फलंदाजी करत होता. एकीकडे धोनीचे आक्रमण पाकिस्तानी गोलंदाजांना रोखता येत नव्हते आणि द्रविडची संयमी फलंदाजीही रोखता येत नव्हती.
धोनी बघता बघता 140 धावांच्याही पुढे गेला. पण अखेर 42 व्या षटकात मोहम्मद हाफिसला त्याला बाद करण्यात यश आले. धोनी 123 चेंडूत 148 धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्याच्या बाद होण्याने त्याची आणि द्रविडची 149 धावांची भागीदारीही तुटली होती. पुढे द्रविडही 59 चेंडूत 52 धावा करुन बाद झाला. पण तोपर्यंत भारताने 300 धावांचा टप्पा गाठला होता. अखेर भारताच्या तळातील फलंदाजांनी भारताला 50 षटकापर्यंत 9 बाद 356 धावांपर्यंत पोहचवलं.
🏏 148 runs off 123 balls
💥 15 fours, four sixes#OnThisDay in 2005, MS Dhoni slammed his maiden international century in an ODI.His 🔥 knock helped India post 356/9 against Pakistan, eventually winning the game by 58 runs! pic.twitter.com/n7B0ZhpEiB
— ICC (@ICC) April 5, 2021
पाकिस्तानचा पराभव आणि धोनीला सामनावीर
भारताने दिलेले 357 धावांचे डोंगराएवढे आव्हान समोर ठेवून पाकिस्तान संघ फलंदाजीला आला. पण त्यांच्याकडून अब्दुल रझाक आणि मोहम्मद युसूफ यांनाच अर्धशतके झळकावता आली. रझाकने 88 आणि युसूफने 71 धावांची खेळी केली. तसेच कमरान अकमलने 41 धावांची आक्रमक खेळी केली होती. मात्र, त्याला अन्य कोणाची साथ मिळाली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 44.1 षटकातच सर्वबाद 298 धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघ हा सामना 58 धावांनी जिंकला होता.
भारताच्या आशिष नेहराने 4 आणि युवराज सिंगने 3 अशा मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच झहीर खान आणि हरभजनने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
धोनीने या सामन्यात केलेल्या आक्रमक खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामनावीर पुरस्कार होता.
धोनीची बहरली कारकिर्द
या शतकानंतर मात्र धोनीने त्याच्या कारकिर्दीत कधी मागे वळून पाहिलेच नाही. काही वर्षातच त्याच्याकडे भारताच्या तिन्ही क्रिकेटप्रकाराच्या संघांचे कर्णधारपदही सोपवण्यात आले. त्यानेही ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केवळ सांभाळलीच नाही, तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने 2007 चा पहिला टी-20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धाही जिंकल्या. इतकेच नाही तर भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली खेळत असताना पहिल्यांदा आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला.
गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी-20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत. तसेच धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे 829 विकेट्स घेतल्या आहेत.