ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या शेवटच्या डावात भारतीय संघापुढे ३२८ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ९७ षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि ३ विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारताने २-१ च्या फरकाने कसोटी मालिकाही जिंकली. विषेश म्हणजे, चौथ्या डावात ३०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची भारताची ही तिसरी वेळ होती.
सर्वप्रथम एप्रिल १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने ही खास कामगिरी केली होती. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात यजमान संघाने चौथ्या डावात भारतापुढे ४०३ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. भारताने १४७ षटकात ४ विकेट्स गमावत ४०६ धावा करत वेस्ट इंडिजचे आव्हान पूर्ण केले होते.
त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने चौथ्या डावात ३००हून अधिक धावांचे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला होता. चेन्नई येथे झालेल्या या सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अवघ्या ९८.३ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर भारताने इंग्लंडचे लक्ष्य गाठत सामना जिंकला होता.
अशाप्रकारे भारताने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात ३००पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मायदेशात एक आणि परदेशात २ वेळा विजय मिळवला आहे. परदेशातील दोन विजय हे भारतीय संघाचे आशिया खंडाबाहेरील विजय असेही म्हणता येतील. कारण हे दोन्ही सामने आशिया खंडाबाहेर वेस्ट इंडिज (कॅरेबियन बेटे) आणि इंग्लंड देशात झाले होते.
ब्रिस्बेन कसोटी सामन्याची आकडेवारी –
ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे ३७० धावांचे भलेमोठे आव्हान उभारले होते. यात मार्नस लॅब्यूशानेच्या (१०८) झुंजार शतकाचा मोठा वाटा होता. प्रत्युत्तरात पहिल्या डावात तळातील फलंदाज वॉशिंग्टन सुंदर(६२) आणि शार्दुल ठाकूर(६७) यांच्या शतकी भागिदारीमुळे भारताने ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३४ धावांची आघाडी मिळाली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात ३४ धावांच्या आघाडीत भर पाडत ऑस्ट्रेलियाने २९४ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी भारतापुढे ३२८ धावांचे लक्ष्य होते. भारतीय युवा फलंदाज शुबमन गिल (९१ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (८९ धावा) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारत ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य पूर्ण करु शकला. भारताने दुसऱ्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर ३२९ धावा करत ३ विकेट्सने सामन्यासह मालिकाही जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ
बॉर्डर-गावसकर चषकात भारताचे निर्विवाद वर्चस्व, तब्बल ‘इतक्या’ वेळा जिंकली आहे मालिका