इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील पहिल्या कसोटी सामन्याने उभय संघातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. यावेळी इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे असणार आहे. अशात वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या इंग्लंडच्या मैदानांवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसण्याची शक्यता आहे.
परंतु मागील २०१८ सालच्या इंग्लंड दौऱ्यावेळी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी जोरदार धावा कुटल्या होत्या. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे. दरम्यान भारतीय फलंदाज मागील १९ वर्षांपासून न जमलेली किमया साधू शकतील का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या १९ वर्षांचा दुष्काळ
इंग्लंडच्या मैदानांवर भारताच्या केवळ २ फलंदाजांनी द्विशतक ठोकण्याची किमया साधली आहे. त्यातही शेवटचे द्विशतक तब्बल १९ वर्षांपूर्वी नोंदवले गेले होते. सर्वप्रथम १९७९ मध्ये ‘लिटल मास्टर’ सुनिल गावसकर यांनी इंग्लंडच्या मैदानावर पहिलेवहिले कसोटी द्विशतक झळकावले होते. त्यावेळी गावसकरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत २२१ धावांची खेळी केली होती. ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळीही आहे.
इंग्लंडच्या भूमीत दुसरे द्विशतक करणारा भारतीय फलंदाज ‘द वॉल’ राहुल द्रविड आहे. द्रविडने २००२ साली २१७ धावा करत हा पराक्रम केला होता. द्रविडची सुद्धा हा कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. पण त्याच्यानंतर २००२ पासून अर्थात मागील १९ वर्षांत कोणताही भारतीय फलंदाज इंग्लंडच्या मैदानावर द्विशतक करू शकलेला नाही.
विराट-रहाणेसह पुजाराकडूनही द्विशतकाची अपेक्षा
त्यामुळे यंदा तरी कोणता फलंदाज मागील १९ वर्षांचा हा द्विशतकाचा दुष्काळ संपवू शकेल का?, हे पाहावे लागेल. तसे तर, सध्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंपैकी बऱ्याचशा फलंदाजांचे इंग्लंडमधील प्रदर्शन चांगले राहिले आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १० कसोटीत ७२७ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेली १४९ धावा इतकी राहिली आहे. त्याच्याव्यतिरिक्त रहाणे (५५६ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (५०० धावा) यांनीही ५०० धावांचा आकडा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चला जरा फिरूया! मायदेशी परतताच ‘या’ खास ठिकाणाला धवनने दिली भेट; चाहत्यांसोबत फोटोही काढले
विंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत पाकिस्तानी फलंदाजाचा टी२०त ‘विश्वविक्रम’, रोहित-धवनलाही पछाडलं
आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आपल्या दोन्ही भारतीय शिष्यांचे मॅकग्राने केले अभिनंदन, म्हणाला…