---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध पृथ्वी शॉमध्ये दिसली ‘विरु’ची झलक; ताबडतोड फलंदाजीसह सेहवागच्या विक्रमाची केली बरोबरी

On: सोमवार, जुलै 19, 2021 1:15 AM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार पृथ्वी शॉला देण्यात आला. शॉने या सामन्यात ताबडतोड फलंदाजी करताना विरेंद्र सेहवागच्या एका विक्रमाची बरोबरी देखील केली आहे.

शॉची तुफानी खेळी
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २६२ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी २६३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची जोडी उतरली. एका बाजूने कर्णधार शिखरने डाव सांभाळला होता. तर, दुसरीकडे शॉने आक्रमक खेळ केला. पण, शॉ ६ व्या षटकात २४ चेंडूत ९ चौकारांसह ४३ धावा करुन बाद झाला.

शॉ या दरमदार खेळीमुळे तो एका वनडे सामन्यात डावाच्या पहिल्या ६ षटकांच्या आत ४० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा गेल्या २० वर्षातील केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. गेल्या २० वर्षांत त्याच्यापूर्वी अशी कामगिरी केवळ विरेंद्र सेहवागने केली आहे.

सेहवागने ९ ऑगस्ट २००५ रोजी श्रीलंकेविरुद्धच झालेल्या वनडे सामन्यात पहिल्या ६ षटकांच्या आत वैयक्तिक ४० धावांचा टप्पा पार केला होता. त्या सामन्यात सेहवाग सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चामिंडा वासविरुद्ध ४८ धावांवर त्रिफळाचीत झाला होता.

भारताने जिंकला सामना  
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या. त्यांच्याकडून चमिका करुणारत्नेने १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. तसेच चरिथ असलंकाने ३८ आणि कर्णधार दसून शनकाने ३९ धावांची खेळी केली. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल भारताकडून शॉ व्यतिरिक्त इशान किशनने ५९ धावांची आणि शिखर धवनने नाबाद ८६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने हा सामना ३६.४ षटकात २६३ धावा पूर्ण करत सहज जिंकला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाबाद अर्धशतकासह ‘गब्बर’ बनला दस हजारी मनसबदार; दिग्गज सलामीवीरांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान

इंग्लंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! बटलरचे धमाकेदार पुनरागमन, मोईन अलीने दाखवला अष्टपैलू खेळ

‘कर्णधार’ धवन पहिल्या वनडेत चमकला! वाडेकर, तेंडुलकर सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---