चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेला पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. इंग्लंडच्या ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या सत्रापर्यंत भारताने ६ बाद १४४ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. यादरम्यान इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन याने भेदक गोलंदाजी करत दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ विकेट्स घेतल्या आहेत. यासह एक नवा विक्रम अंडरसनच्या नावे झाला आहे.
या ३८ वर्षीय गोलंदाजाने चेन्नई कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात सर्वप्रथम शुबमन गिलची दांडी उडवली. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शून्य धावांवर त्रिफळाचित केले. एवढेच नव्हे तर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही झेलबाद करत पव्हेलियनला पाठवले. यापुर्वी पहिल्या डावात त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या.
या ५ विकेट्सची भर पडल्याने अंडरसनने वयाची तिशी ओलांडल्यानंतर कसोटीतील तब्बल ३४३ विकेट्सचा आकडा गाठला आहे. मे २००३ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर त्याने १५८ सामन्यात एकूण ६११ विकेट्स घेतल्या आहेत.
अशाप्रकारे वयाची तिशी पूर्ण केल्यानंतर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज कर्टनी वॉल्श यांना पिछाडीवर सोडले आहे. वॉल्श हे ३४१ विकेट्ससह या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. तर ग्लेन मॅकग्राथ आणि रिचर्ड हेडली अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाची बाब अशी की, अंडरसन हा वयाची ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर ३०० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव सक्रिय वेगवान गोलंदाज आहे.
वयाची ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
३४३ विकेट्स- जेम्स अंडरसन
३४१ विकेट्स- कर्टनी वॉल्श
२८७ विकेट्स- ग्लेन मॅकग्राथ
२७६ विकेट्स- रिचर्ड हेडली
महत्त्वाच्या बातम्या-
अंडरसन ऑन फायर! एकाच षटकात उडवली गिल आणि रहाणेची दांडी, पाहा भन्नाट व्हिडिओ
हीच ती वेळ, लढा आणि जिंका! चेन्नई कसोटीबाबत टीम इंडियाची अंतिम चर्चा, पाहा व्हिडिओ






